हवामानपूरक डिजिटल आणि हरित तंत्रज्ञानामुळे किनारपट्टीवरील शेतीत क्रांती घडेल – डॉ. संजय भावे
वेंगुर्ला : बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी हवामानपूरक डिजिटल तंत्रज्ञान आणि हरित तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून, त्यामुळे किनारपट्टीवरील शेती आणि संलग्न क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडेल, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.
वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आयोजित चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ‘किनारपट्टी आणि संलग्न कृषी परिसंस्थांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी हवामानपूरक डिजिटल आणि हरित तंत्रज्ञान’ हा परिसंवादाचा विषय होता.
इंडियन सोसायटी ऑफ कोस्टल अॅग्रीकल्चरल रिसर्च (ISCAR), कॅनिंग टाउन, पश्चिम बंगाल, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, केंद्रीय मृदा क्षारता संशोधन संस्था, कर्नाल, ISCAR दापोली चॅप्टर आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. भावे म्हणाले की, किनारपट्टीचे प्रदेश हे जगातील अत्यंत उत्पादक, जैवविविधतेने समृद्ध आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील परिसंस्थांपैकी आहेत. भौगोलिक क्षेत्रफळ तुलनेने कमी असले तरी जागतिक लोकसंख्येच्या मोठ्या भागाला हे प्रदेश आधार देतात. अन्न उत्पादन, मत्स्यव्यवसाय, व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
भारतात सुमारे २५ कोटी लोक समुद्रकिनाऱ्यापासून ५० किलोमीटरच्या परिसरात राहतात. देशातील नऊ किनारपट्टीवरील राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा भाग विस्तारलेला आहे. किनारपट्टीच्या परिसंस्था केवळ शेतीपुरत्या मर्यादित नसून मत्स्यव्यवसाय, मत्स्यशेती, जैवविविधता संवर्धन, सागरी संसाधने, पर्यटन आणि नील अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वपूर्ण आहेत.
बदलत्या हवामानामुळे किनारपट्टीच्या भागातील कृषी उत्पादकता, पोषण सुरक्षा, अन्नसुरक्षा आणि तेथील समुदायांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर थेट परिणाम होत आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी हवामानपूरक डिजिटल उपाययोजना आणि हरित तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे ऑक्सफर्ड विद्यापीठातील कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रमाचे संचालक प्रा. अजित जावकर यांनी परिसंस्थांच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. किनारपट्टीवरील समुदायांच्या समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.
ISCAR चे अध्यक्ष डॉ. बी. माजी यांनी परिसंवादाचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यावरणीय आव्हानांचा परिणाम आता लोकांच्या उपजीविकेवर होत असल्याने संशोधनाला नवी दिशा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कोकण विभागातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये निलकेश दळवी (कर्जत), जयप्रकाश चिमणकर (वेंगुर्ला), कांचन बर्वे (लांजा), नितीन कुबल (वेंगुर्ला), माधव शेट्ये (दापोली), प्रसन्न गोगटे (देवगड), मिलिंद सावंत (रत्नागिरी), सचिन दळवी (वेंगुर्ला), सचिन तोडणकर (दापोली), संदीप राणे (कणकवली), मिथिलेश देसाई (लांजा), शिवप्रसाद देसाई (सिंधुदुर्ग), प्रमोद दळवी, आदेश बार्डे आणि संदीप माने (वेंगुर्ला), विजय सावंत (कणकवली), निलेश हाटकर (रत्नागिरी) आणि जनार्दन तेली (देवगड) यांचा समावेश होता.
ISCAR तर्फे डॉ. जे.एस.पी. यादव सर्वोत्कृष्ट संशोधन लेख पुरस्कारासाठी डॉ. पी. बी. वनवे यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. ISCAR फेलोशिप पुरस्काराने डॉ. यू. भगवती अमल (पुदुचेरी), डॉ. यू. के. मंडल (पश्चिम बंगाल), डॉ. लक्ष्मीकांत नाईक (कोलकाता) आणि डॉ. अनिल चिंचमलतपुरे (भरूच, गुजरात) यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी परिसंवादाच्या स्मरणिकेचे तसेच डॉ. यशवंत गोवेकर आणि सहकाऱ्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. टी. डी. लामा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मकरंद करमरकर यांनी केले, तर आभार डॉ. संतोष सावर्डेकर यांनी मानले. कार्यक्रमाला कोकण विभागीय सहसंचालक शिवाजीराव आमले यांच्यासह सुमारे २५० शास्त्रज्ञ, ५० विद्यार्थी, २५ प्रगतिशील शेतकरी आणि २५ उद्योजक उपस्थित होते. परिसंवादाच्या आयोजनासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
