सुमीत एसएसजीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० लाखांचे योगदान
मुंबई : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आणि पिकांच्या नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सुमीत एसएसजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० लाख रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. सुमीत एसएसजीचे अध्यक्ष सुमित साळुंके आणि उपाध्यक्ष दिएगो प्रिएटो ज्युनियर यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या योगदानाचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या योगदानाबद्दल सुमीत एसएसजीचे आभार मानले.
यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने राज्यातील अनेक भागांत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम केवळ शेती आणि पिकांवरच नव्हे, तर शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन पाण्याच्या गरजांवर तसेच त्यांच्या पशुधनाच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही झाला आहे. अशा परिस्थितीत वेळेवर मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणींची जाणीव ठेवून सुमीत एसएसजीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. जीवनरक्षक आपत्कालीन सेवा क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आपल्या नियमित कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन समाजाच्या व्यापक हितासाठी योगदान देण्यावर विश्वास ठेवते.
