महात्मा फुले जन्मद्विशताब्दी आणि चवदार तळे सत्याग्रह शताब्दीनिमित्त २६ नोव्हेंबरला भव्य सांस्कृतिक महोत्सव
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सम्यक साहित्य साहित्य संमेलन यांच्या वतीने आयोजन
- परिसंवाद, जीवनगौरव पुरस्कार वितरण आणि ‘द्विशताब्दी क्रांतीसूर्याची, गाथा संविधानाची’ महाजलसा होणार; उपमहापौर परशुराम वाडेकर यांची माहिती
पुणे : भारतीय संविधान दिन, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाचे औचित्य आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी २ ते रात्री 10 पर्यंत विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार आहे. अशी माहिती महोत्सवाची माहिती विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के उपथित होते.
महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानिक विचार आणि चवदार तळे सत्याग्रहातून निर्माण झालेला सामाजिक न्यायाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे वाडेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता ‘आम्ही संविधानाचे लोक… एक संगीतमय जागृती’ या गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. गायक अशोक गायकवाड हे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य आणि भारतीय संविधानातील समता व सामाजिक न्यायाच्या विचारांचे प्रेरक स्रोत या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत अरुण खोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात निवृत्त न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे आणि विचारवंत मिलिंद टिपणीस सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ५.३० वाजता दोन मान्यवरांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, तर महाड चवदार तळे ऐतिहासिक आंदोलनातील योगदानाबद्दल मा. सुरेंद्रनाथ टिपणीस यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. बाबा आढाव यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी डॉ. शिलाताई आढाव, तर सुरेंद्रनाथ टिपणीस यांचा पुरस्कार मिलिंद टिपणीस स्वीकारणार आहेत. महात्मा फुले पगडी, सन्मानपत्र आणि रोख 51 हजार रुपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
सायंकाळी ६ वाजता ‘द्विशताब्दी क्रांतीसूर्याची, गाथा संविधानाची’ हा भव्य महाजलसा होणार आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमात अंजली गडपायले, नागसेन सावदेकर, शिरीष पवार, चेतन चोपडे, कुणाल वराळे, रागिणी प्रतापसिंह बोदडे, अजय देहाडे, कलाकार सहभागी होणार आहेत.
या महोत्सवाला डॉ. विजय खरे, डॉ. अनिल सपकाळ, डॉ. राजामामा भलमे, अॅड. मोहन वाडेकर, प्रा. किरण सुरवसे, डॉ. निशा भंडारे, डॉ. निळकंठ शेर, पुणे शहर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे आणि माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करावा, असे आवाहन वाडेकर यांनी केले.
