मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची शारीरिक चाचणी चुकणार नाही; महिला उमेदवारांना मिळणार मुदतवाढ
मुंबई : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी (एमसी) आल्यामुळे एखाद्या तरुणीला चाचणी देता आली नाही, तर तिची संधी हुकणार नाही. अशा उमेदवारांना वैद्यकीय तपासणीनंतर पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही घोषणा केली.
पोलीस भरतीसाठी अनेक तरुणी महिनोन्महिने मेहनत घेतात. धावण्याचा सराव, व्यायाम आणि इतर शारीरिक चाचण्यांची तयारी करण्यासाठी त्या मोठे कष्ट घेत असतात. मात्र, ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास काही तरुणींना तीव्र पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्याचा त्रास होतो. त्यामुळे धावणे, गोळाफेक आणि लांब उडी यांसारख्या चाचण्या देताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
विशेषतः १०० मीटर आणि ८०० मीटर धावण्याच्या चाचण्यांमध्ये अशा शारीरिक त्रासाचा कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असते. प्रत्येक महिलेच्या शरीराची स्थिती आणि मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास वेगवेगळा असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत उमेदवारांच्या अडचणींचा विचार करणे आवश्यक असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अपूर्वा देशपांडे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिला उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणी देण्यासाठी पाच ते सहा दिवसांची अतिरिक्त मुदत मिळणार आहे. त्यामुळे मासिक पाळीमुळे अनेक महिन्यांची मेहनत आणि पोलीस होण्याची संधी वाया जाण्याची भीती कमी होणार आहे.
