Friday, November 20, 2026
Latest NewsPUNE

जगण्याचे मर्म समजलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डाॅ.वर्तक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डाॅ. पराग काळकर यांचे उद्गार

 

​वर्तक कुटुंबियांच्या वतीने वृक्षमित्रांचा आधारवड – डाॅ. वा. द. वर्तक (सुह्रदांच्या आठवणी) या संकलनाचे लोकार्पण

​पुणे – वर्तक सर म्हणजे जगण्याचे मर्म समजलेले व्यक्तिमत्त्व. आपल्या प्रत्येक कृतीतून समाजाला देत राहण्याचे व्रत त्यांनी जपले, असे उद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डाॅ. पराग काळकर यांनी गुरुवारी येथे काढले.

ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक डाॅ. वा. द. वर्तक यांच्या १०१ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून वर्तक कुटुंबियांनी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. वर्तक सरांचे सहकारी, मित्र, विद्यार्थी, परिचित आणि नातेवाईक, यांनी सरांविषयी व्यक्त केलेल्या आठवणींच्या संकलनाचे “वृक्षमित्रांचा आधारवड – डा. वा. द. वर्तक (सह्रुदांच्या आठवणी)” या नावाने याप्रसंगी लोकार्पण करण्यात आले. शनिवार पेठेतील शुभश्री सभागृहात झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर, भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन (बाएफ)चे माजी अध्यक्ष डॉ. नारायण हेगडे, केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डाॅ. क. कृ. क्षीरसागर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डाॅ. श्रीकांत इंगळहळीकर, ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर, अजित नागपूरकर, डाॅ. अर्चना गोडबोले, वर्तक यांचे चिरंजीव डॉ. अजित वर्तक आणि अनिल वर्तक, आघारकर संस्थेचे माजी संचालक डॉ. व्ही. एस. पी. राव आणि डॉ. दिलीप रानडे तसेच अन्य कुटुंबीय उपस्थित होते.

डाॅ. काळकर म्हणाले, वर्तक सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून आणि वनस्पतींचे गाढे अभ्यासक – संशोधक आणि विश्लेषक म्हणून, संगीतप्रेमी रसिक म्हणून त्यांची अनेक वैशिष्ट्ये या संकलित पुस्तकातून उलगडली आहेत. मराठीतून विज्ञान प्रसार करण्याचे कार्यही त्यांनी केले. लेखक म्हणून त्यांनी सदैव जाणीवजागृतीचे काम केले. वृक्षप्रेमाचा, निसर्गस्नेही जीवनशैलीचा संदेश त्यांनी नेहेमी केले, जे नित्य स्मरणीय आणि प्रेरणा देणारे आहे.
​

डाॅ. करमळकर म्हणाले, नेमकी दिशा ठरवून आणि वसा घेऊन उभे केलेले कार्य म्हणजे वर्तक सर. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, आधुनिक साधने उपलब्ध नसतानाही, सरांनी वृक्षसंग्रहाचे जे कार्य केले, त्याला तोड नाही. आज नव्या शैक्षणिक धोरणामुळे कुठल्याही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांला आवडीची अन्य विद्याशाखा घेता येते. संशोधन-अभ्यास करता येतो. त्यामुळे वनस्पतीशास्त्र या विद्याशाखेची निवड करून नव्या संशोधकांनी सरांच्या संशोधनाच्या छायेत पुढील संधींचा शोध घ्यावा. विज्ञान साहित्याची रुची निर्माण करावी. वर्तक कुटुंबियांनी सरांविषयीच्या या आठवणींचे संकलन प्रकाशित करून एक अमूल्य ठेवा आपल्या सुपूर्द केला आहे.​ सूर्यवंशी यांनी वर्तक सरांच्या कार्याला असणारा सामाजिक आयाम ट्रस्टचे कार्य पुढे नेण्यासाठी मार्गदर्शक असल्याची भावना व्यक्त केली.

प्रा. घाणेकर म्हणाले, माझ्या विद्यार्थीदशेपासून आमचा संबंध होता. मराठी विज्ञान परिषदेसाठी आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले. हेरीटेज वाॅकप्रमाणे सरांनी ट्री वाॅक चा उपक्रम यशस्वी केला होता. तसेच अतिशय निगुतीने फर्ग्युसन कॉलेजमधील वनस्पती उद्यानाचा सांभाळ केला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.

डाॅ. अविनाश वाचासुंदर, डाॅ. क. कृ. क्षीरसागर, श्रीकांत इंगळहळीकर, डाॅ. विनया घाटे, डॉ. नारायण हेगडे, डॉ अनुराधा उपाध्ये आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अजित वर्तक आणि अनिल वर्तक यांनी पुस्तकामागील संकल्पना स्पष्ट केली. सीओईपीचे वनस्पतीविभाग प्रमुख डाॅ. महेश शिंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

​ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ, संशोधक व लेखक डाॅ. वा. द. वर्तक यांच्याविषयी व्यक्त केलेल्या आठवणींच्या संकलनाचे “वृक्षमित्रांचा आधारवड – डा. वा. द. वर्तक (सह्रुदांच्या आठवणी)” या नावाने लोकार्पण करण्यात आले. यावेळी (डावीकडून) बाएफचे माजी अध्यक्ष डॉ. नारायण हेगडे, केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डाॅ. क. कृ. क्षीरसागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डाॅ. पराग काळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि वर्तक यांचे चिरंजीव डॉ. अजित वर्तक आणि अनिल वर्तक.

Leave a Reply