Saturday, November 21, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

माझी आणि व्हीएसआर कंपनीच्या लोकांचीही नार्को टेस्ट करा; रोहित पवारांचे सरकारला थेट आव्हान

पुणे : अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी व्हीएसआर (VSR) कंपनीला क्लीनचिट देण्यासाठी घाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सोशल मीडियावरील ट्रोलर्सपासून ते काही आमदार आणि मंत्र्यांपर्यंत अनेकजण एकाच सुरात कंपनीची बाजू घेत असल्याचा दावा त्यांनी केला. अजितदादांना न्याय मिळवून देण्याऐवजी सरकारी यंत्रणाच एका कंपनीच्या समर्थनासाठी काम करत असल्याचे चित्र दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.

रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत सरकार आणि व्हीएसआर कंपनी यांच्यातील कथित संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. एका मंत्र्याने आपली नार्को टेस्ट करण्याची मागणी केल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. ‘माझी नार्को टेस्ट आजच्या आज करा; मात्र त्यासोबत त्यांचीही नार्को टेस्ट करा. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,’ असे त्यांनी म्हटले आहे.
आपण नार्को टेस्टसाठी कधीही तयार असल्याचे सांगतानाच सत्य समोर येण्याच्या भीतीने संबंधित व्यक्ती या चाचणीला तयार होतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा निष्पक्ष तपास होऊन दोषींवर कारवाई व्हावी, याऐवजी एका कंपनीची पाठराखण करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी या प्रकरणातील संशयित संबंधांची चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

Leave a Reply