तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे कठपुतळी कलेला मिळाले नवे आयाम
पुणे : सुमारे ८०० वर्षे जुन्या पारंपरिक कठपुतळ्यांचे डिजिटल स्कॅनिंग करून त्यांचे थेट सादरीकरणात प्रक्षेपण करणे, सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंप्रकाशित कठपुतळ्यांचा वापर अशा विविध प्रयोगांतून कठपुतळी कला तंत्रज्ञानाची कास धरत नवनवीन अभिव्यक्तीचे मार्ग शोधत आहे. पारंपरिक कलेचा गाभा कायम राखत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याने या कलेच्या सादरीकरणाला नवे आयाम मिळत आहेत, असे मत प्रख्यात कठपुतळी कलाकार, दिग्दर्शिका आणि संकल्पनाकार अनुरूपा रॉय यांनी व्यक्त केले.
पुण्यात सुरू असलेल्या पपेट फेस्टिवलमधील कठपुतळी निर्मिती कार्यशाळेत कठपुतळी कलाकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव २२ नोव्हेंबरपर्यंत श्रीराम लागू रंग-अवकाश येथे सुरू राहणार आहे. पारंपरिक आणि समकालीन कठपुतळी कलेचा परिचय करून देणाऱ्या या महोत्सवात सादरीकरणे, कार्यशाळा आणि संवादात्मक सत्रांचा समावेश आहे.
कठपुतळी कलेच्या बदलत्या स्वरूपाविषयी बोलताना रॉय यांनी डिजिटल साधने, नावीन्यपूर्ण साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील तंत्रांचा वापर करून कलाकार नवनवे प्रयोग करीत असल्याचे सांगितले. मात्र, या प्रयोगांमध्ये पारंपरिक कलाप्रकारांशी असलेली नाळ कायम राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्नाटकातील ज्येष्ठ कठपुतळी कलाकार गुंडुराजू यांच्यासोबत केलेल्या कामाचा दाखला देताना त्यांनी त्यांच्या संग्रहातील सुमारे ८०० वर्षे जुन्या कठपुतळ्यांच्या पुनरुज्जीवनाचा अनुभव सांगितला. या कठपुतळ्यांचे डिजिटल स्कॅनिंग करून त्यांची प्रतिमा प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान विविध पृष्ठभागांवर प्रक्षेपित करण्यात आली. त्या म्हणाल्या, “आम्ही त्याच पारंपरिक कठपुतळ्यांचे स्कॅनिंग करून त्यांचा प्रयोगात वापर केला. ८०० वर्षे जुनी कठपुतळी आणि आजच्या काळातील ॲनिमेशन यांची सांगड घालून, प्रत्यक्ष सादरीकरणादरम्यान त्यांचे प्रक्षेपण करणे हा अतिशय रंजक अनुभव ठरला .”
तंत्रज्ञानामुळे कठपुतळी नाट्याच्या अभिव्यक्तीच्या कक्षा विस्तारत असल्याचे सांगताना त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर्स आणि लहान आकाराच्या कठपुतळ्यांचा वापर विशेषतः विशिष्ट जागांशी निगडित सादरीकरणांमध्ये वाढत असल्याचे नमूद केले. इलेक्ट्रॉनिक सर्किट्सच्या साहाय्याने स्वयंप्रकाशित होणाऱ्या कठपुतळ्या, ओव्हरहेड प्रोजेक्टर्स आणि प्रकाशयोजनेतील नावीन्यपूर्ण प्रयोग यांमुळे सादरीकरणात नवे दृश्यात्मक परिणाम साधता येत आहेत. कठपुतळी प्रयोगांमध्ये प्रकाशयोजनेचा वापर आता जणू कॅमेऱ्याच्या नजरेप्रमाणे केला जात असून, त्यातून दृश्यात्मक कथन अधिक प्रभावी होत आहे. कठपुतळ्यांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यामध्येही बदल होत आहेत. विमाननिर्मिती उद्योगात वापरल्या जाणाऱ्या हलक्या वजनाच्या साहित्याचा वापर करून भव्य आकाराच्या कठपुतळ्या तयार केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानातील प्रयोगांबरोबरच कठपुतळी कलेचे संवर्धन करण्यासाठी नव्या पिढीतील कलाकार घडवण्याची गरजही रॉय यांनी अधोरेखित केली. दिल्लीस्थित त्यांच्या ‘कटकथा पपेट आर्ट्स ट्रस्ट’ या संस्थेतर्फे १५ दिवसांचा विशेष प्रशिक्षण आणि जडणघडण कार्यक्रम राबवण्यात येतो. विविध कलाक्षेत्रांतील तरुण कलाकारांना एकत्र आणून त्यांना पटकथा लेखन, कथाकथन, कठपुतळी निर्मिती, सादरीकरण, संगीत आणि प्रकाशयोजना यांचे प्रशिक्षण दिले जाते. निवड झालेल्या कलाकारांना त्यांच्या स्वतंत्र कलाकृती विकसित करण्यासाठी अनुदान आणि तीन महिन्यांचे मार्गदर्शनही दिले जाते.
भारतीय कठपुतळी कलेची परंपरा दोन हजार वर्षांहून अधिक जुनी असल्याचे सांगून तिच्या संवर्धनाविषयीच्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “कठपुतळी या वस्तूऐवजी कलाकाराला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. कठपुतळ्या विकत घेऊन त्या संग्रहालयात ठेवण्याने ही कला जिवंत राहणार नाही. त्यासाठी कठपुतळी कलाकार, त्यांची कुटुंबे, गुरू आणि नव्या पिढीतील कलाकार यांच्यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.”
शिक्षणाच्या क्षेत्रातही कठपुतळी कला प्रभावी माध्यम ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेषतः विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषय मनोरंजक पद्धतीने शिकवण्यासाठी कठपुतळी कलेचा उपयोग करता येऊ शकतो. त्यामुळे अध्ययन प्रक्रिया अधिक सहज, रंजक आणि आनंददायी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
