Saturday, November 21, 2026
Latest NewsSports

इंडिया इंटरनॅशनल तायक्वांदो स्पर्धा शानदार सोहळ्यामध्ये स्पर्धेला प्रारंभ 

पुणे : युवा कलाकारांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्य रचनांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ख्यातनाम अभिनेते निकीतीन धीर यांची उपस्थिती यामुळे इंडिया तायक्वांदो आयोजित पहिल्या इंडिया इंटरनॅशनल तायक्वांदो स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरला

शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग सभागृहात अतिशय रेखीवपणे सजावट केलेल्या व्यासपीठावर नृत्य कलाकारांनी गणेश वंदना, शिवस्तुती या पारंपारिक रचनांबरोबरच चित्रपटातील गीतांच्या आधारेही आकर्षक रचना सादर केल्या. त्यास प्रेक्षकांनी जल्लोषात साथ दिली.

इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगांवकर यांनी प्रास्ताविक करताना या स्पर्धेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच पुढील वर्षी ग्रां. प्रि स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. इंडिया तायक्वांदोचे उपाध्यक्ष व उत्तर प्रदेश मधील राज्यमंत्री तरुण राठी, आशियाई तायक्वांदो युनियनच्या उपाध्यक्ष नॅन्सी अदनान हसन अली, ज्येष्ठ अभिनेते निकितीन धीर यांनीही आपले विचार व्यक्त केले. विशेषतः धीर यांनी शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्यावर प्रेक्षकांनीही त्यास मनापासून दाद दिली. श्री. फाजेर, फदी जेसर ताहेर हुसेन, सुनील पासवान, ली जुंग हेई, पूरम टमटा, संदीप ओंबासे,अनिल झोडगे, अभिषेक दुबे आदी ज्येष्ठ संघटक तसेच आशियाई कास्यपदक विजेती रुपाल बायर यांच्या उपस्थितीमुळे हा समारंभ वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

या उद्घाटन सोहळ्यात खेळाडूंच्या वतीने अनन्या देसाई व अमोघ तुपे यांनी शपथ घेतली.

ही स्पर्धा दिनांक २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेमध्ये १७ देशांचे बाराशे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय ‘अ’ श्रेणीचा दर्जा असून या स्पर्धेत चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना ऑलिंपिक निवडीच्या दृष्टीने मानांकन मिळणार आहेत. त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना मिळणार आहे. या स्पर्धेला लोट्टे, क्लाउड नाइन यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

Leave a Reply