गुलिगत सूरज चव्हाण दक्षिण कोरियातही लोकप्रिय; कोरियन तरुण म्हणाला, ‘इंडियन जस्टिन बीबर’
मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि सोशल मीडियावर आपल्या अनोख्या शैलीने लोकप्रिय झालेला सूरज चव्हाण आता सातासमुद्रापारही चर्चेत आला आहे. दक्षिण कोरियातील एका तरुणाने सूरजला ओळखून त्याचा उल्लेख ‘इंडियन जस्टिन बीबर’ असा केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यावर मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.
एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दक्षिण कोरियात सूरज चव्हाण लोकप्रिय असल्याचा दावा करण्यात आला आहे. सूरज कोरियातील विमानतळावर पोहोचला, तर त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी होईल. अगदी इमिग्रेशन अधिकारीही त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतील, असे गंमतीशीर भाष्य या इन्फ्लुएन्सरने केले आहे.
त्यानंतर त्याने आपल्या कोरियन मित्राला काही भारतीय प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो दाखवून त्यांची ओळख विचारली. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवला असता, त्याने ते भारताचे पंतप्रधान असल्याचे अचूक ओळखले. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो दाखवल्यावर त्याने त्यांना ओळखत नसल्याचे सांगितले. यानंतर सूरज चव्हाणचा फोटो समोर येताच त्या तरुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता सूरजला ‘इंडियन जस्टिन बीबर’ असे संबोधले.
सूरजला एवढे का ओळखतोस, असे विचारल्यावर तो तरुण सूरजचे व्हिडीओ खूप मजेशीर असतात, असे सांगतो. सूरजच्या याच विनोदी शैलीने त्याला आकर्षित केल्याचे त्याच्या प्रतिक्रियेतून दिसून येते.
‘गुलिगत’ आणि ‘झापुक झुपूक’ या खास शब्दांमुळे सूरजने सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या बोलण्याची ढब, विनोदी व्हिडीओ आणि साध्या-सोफ्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याचा चाहतावर्ग वाढत गेला. ‘बिग बॉस मराठी’च्या विजेतेपदानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. आता दक्षिण कोरियातील तरुणाने त्याला ओळखल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सूरजच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, दक्षिण कोरियात सूरज किती लोकप्रिय आहे, याबाबतचा दावा संबंधित इन्फ्लुएन्सरने केला असून, व्हायरल व्हिडीओमुळे त्याच्या चाहत्यांना मात्र आनंदाची नवी संधी मिळाली आहे.
