fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

पुणेकरांनी अनुभविले बनारस घराण्याचे तबलावादन आणि गायन

पुणे  : बनारस घराण्याचे घरंदाज तबलावादन आणि बहारदार गायन आज पुणेकर रसिकांनी अनुभवले निमित्त होते सुप्रसिद्ध तबलावादक पं. अरविंद कुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कल या संस्थेच्या वतीने आयोजित ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे. तबलासम्राट पद्मविभूषण पं किशन महाराज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत त्यांचे शिष्य पं अरविंद कुमार आझाद यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

किराणा घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर हे यावेळी आवर्जून उपस्थित होते.

आपले गुरु पं. किशन महाराज यांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने मागील २८ वर्षे अरविंद कुमार आझाद हे ‘श्रद्धा सुमन’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करीत असतात. सदर वर्ष हे पं. किशन महाराज यांचे जन्मशताब्दी वर्ष असून प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून अरविंद कुमार आझाद आपल्या गुरुंना आदरांजली वाहत आहेत. या शृंखलेतील हा शेवटचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाने तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्म शताब्दीचा समारोप होत आहे हे विशेष.

या दोन दिवसीय सांगितिक कार्यक्रमाच्या आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात स्वत: पं अरविंद कुमार आझाद यांच्या एकल तबलावादनाने झाली. त्यांनी यावेळी बनारस घराण्याचे पारंपारिक उठाण, कायदे, रेला यांचे दमदार सादरीकरण केले. याबरोबरच पं अनोखेलाल जी यांची गत, पंडित रामसहायजी यांची लय वैविध्य असलेली गत देखील आझाद यांनी सादर केली. बनारस घराण्याचे स्तुती परण वाजवीत त्यांनी आपल्या तबला वादनाचा समारोप केला. बनारस घराण्याचा तबलावादन हे शृंगारपूर्ण आहे. त्यामुळेच ते सादर करताना कायमच आनंद होते असे पं अरविंद कुमार आझाद यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी पंडित अरविंद कुमार आझाद यांना धर्मनाथ मिश्रा (संवादिनी) आणि संदीप मिश्रा (सारंगी) यांनी साथसंगत केली.

यानंतर बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आणि पं राजन साजन मिश्रा यांचे शिष्य असलेले डॉ. प्रभाकर व डॉ दिवाकर कश्यप या कश्यप बंधूच्या एकत्रित शास्त्रीय गायनाने कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. कश्यप बंधूंनी यावेळी राग मेघची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी विलंबित झपताल सादर केला. यानंतर त्यांनी ‘प्रबल दल साज जग…’ आणि द्रुत एकतालातील ‘कजरा कारे कारे, लागे अति प्यारे…’, ‘बरसन लागे…’ या बंदिशी प्रस्तुत केल्या.

त्यांना पंडित अरविंद कुमार आझाद (तबला), धर्मनाथ मिश्रा (संवादिनी), संदीप मिश्रा (सारंगी), अनिल जेडे व मयुरेश भुसेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन आनंद देशमुख यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: