अमूर्त कलेत प्रयोगशीलता हे भारतीय अभिजात संगीताचे वैशिष्ट्य
पुणे : अभिजात भारतीय संगीत ही अमूर्त कला आहे. मात्र, शास्त्रपक्ष जपत, प्रतिभावंत कलाकार, सादरीकरणात प्रयोगशील राहून दर क्षणी नवे सौंदर्य निर्माण करू शकतो. कलाप्रस्तुतीचे हे वैशिष्ट्य परंपरा ‘प्रवाही‘ ठेवते, असे मत सांगीतिक वारसा जपणाऱ्या कलाकारांनी सप्रयोग मांडले.
गुरुजनांकडून मिळालेला सांगीतिक वारसा यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या कलाकारांचा सप्रयोग आणि संवादात्मक अशा वेगळ्या धाटणीचा ‘गुण घेईन आवडी–शिष्य परंपरा‘ हा कार्यक्रम पंडित कमलाकर जोशी शिष्यपरिवार आणि गांधर्व महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आला होता. ‘गुण घेईन आवडी‘ या मालिकेतील हे चौथे पुष्प होते. अभिजात संगीत परंपरा पुढे नेणाऱ्या मेघना सरदार (गुरू पंडित उदय भवाळकर) आणि कविता खरवंडीकर (गुरू पंडित बबनराव हळदणकर) या दोन कलाकारांचा सहभाग होता. त्यांनी गुरूंचे गुण कसे आत्मसात केले आणि त्या त्यांच्या शिष्य वर्गाला कशा पद्धतीने तयार करीत आहेत याचे सप्रयोग सादरीकरण केले.
कविता खरवंडीकर यांनी राग खंबावती, मारुबिहाग, कोमल रिषभ आसावरी, तोडी, जौनपुरी, मालकंस, जोग तसेच सरगमगीत, तराणा यांची माहितीपूर्ण झलक पेश करत गुरू पं. हळदणकर आणि आग्रा घराण्याच्या वैशिष्ट्यांचा पट उलगडला. ‘नोमतोम आलापी, मींड, घसीट, अनियमित लय, बहलावा आदी घटकांचे विवेचन करत त्या म्हणाल्या,‘घराण्यावर लेबल नसावे. शिकण्यासाठी, रियाजासाठी ती आवश्यक शिस्त आहे. प्रस्तुतीमध्ये कोणत्या सांगीतिक घटकाला प्राधान्य आहे, याची ती चौकट आहे. गुरूकृपा आणि सातत्याने रियाज, चिंतनाने गुरुंचा आणि परंपरेचा विचार पुढे नेणे, हे शिष्यांचे कर्तव्य आहे.’
मेघना सरदार यांनी ध्रुपद गायकीची वैशिष्ट्ये विशद करताना राग पटदीप, गोरखकल्याण, श्री, यमन यांचे सांगीतिक अंश सादर करत गुरू पं. भवाळकर यांच्या कलाविचारांचे पाथेय रसिकांसमोर ठेवले. ध्रुपद गायकीत आवाजाची जोपासना, स्वर अधिकाधिक ‘बोलका‘ करण्यासाठी गुरू कशी साधना करून घेतात, याची माहिती दिली. ‘ध्रुपद गायकीचे रागरूप प्रामुख्याने आलापचारी, जोड यातूनच मांडले जाते तर बंदिश अगदी शेवटी अल्प काळासाठी येते. आलापी हाच ध्रुपद गायकीचा गाभा आहे. उत्स्फूर्तता, उपज यातून साधकाने स्वतःसह रसिकांना स्वरविलीनतेकडे नेणे, हे त्याचे मर्म आहे, असे त्या म्हणाल्या.
नेहा लिमये, शुभदा आठवले, धनंजय खरवंडीकर यांनी कलाकारांशी संवाद साधला. धनंजय खरवंडीकर (तबला), शुभदा आठवले (हार्मोनियम), गणेश फपाळ (पखवाज) यांनी पूरक साथसंगत केली. विवेक जोशी, विदुला सहस्रबुद्धे, पंडित विवेक पंडित यांनी स्वागत केले. आयोजक अरविंद परांजपे यांनी प्रास्ताविक केले. सुरवातीला पं. हळदणकर तसेच पं. भवाळकर यांच्या मुलाखतीचे अंश दृकश्राव्य माध्यमातून दाखविण्यात आले.