MPSC परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अखेर जाहीर
मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आता राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ही परीक्षा आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. सर्वात आधी नियमित वेळापत्रकानुसार एमपीएससी पूर्व परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन १३ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले होते तसे परिपत्रक १७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र १३ सप्टेंबरलाच नॅशनल एलिजीबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे एमपीएससी पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर ऐवजी रविवार २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणार, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता राज्यातील कोविड-१९ स्थितीमुळे केवळ पूर्व परीक्षाच नव्हे तर या दरम्यानच्या काळातील एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
