लोकशिक्षकांकडून होते समाज जीवनात उपयुक्त धडे देण्याचे काम – डॉ. विकास कशाळकर
पुणे : आजच्या नविन शैक्षणिक धोरणामध्ये लोकशिक्षकांना जास्त महत्व प्राप्त झाले आहे. कारण आपली कला, संस्कृती जतन करण्याचे काम हे शिक्षक करीत आहेत. जगण्याचे जीवनमूल्य आपण शाळेपेक्षा जास्त समाजातून शिकत असतो. समाज जीवनातील हे धडे देण्याचे काम लोकशिक्षक करीत असतात. समाजातून घडलेला, समाजासाठी काम करणारा आणि समाजाची उन्नती करणारा लोकशिक्षक असतो, असे मत ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ आणि ठाकूर परिवाराच्यावतीने ज्येष्ठ शाहीर व शिक्षक कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ यंदाचा लोकशिक्षक पुरस्कार संगीतशिक्षक पंडित प्रमोद मराठे यांना गांधर्व महाविद्यालय येथे प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष पराग ठाकूर, शिरीष मोहिते, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, अमर लांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन अरुणकुमार बाभुळगावकर, होनराज मावळे यांनी केले. गांधर्व महाविद्यालय येथे रांगोळी, दाराला तोरण, सनई-चौघड्यांच्या वादनात मराठे यांना सन्मानित करण्यात आले. मानाचा फेटा, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्काराला उत्तर देताना पं. प्रमोद मराठे म्हणाले, जसे चांगले गुरू मिळण्यासाठी नशीब लागते तसेच चांगले शिष्य मिळण्यासाठी देखील चांगले भाग्य असावे लागते. उत्तम शिष्यरुपी हिºयांना पैलू पाडण्याचे काम शिक्षक करीत असतात. गांधर्व विद्यालयाने मला ही जागा उपलब्ध करून दिल्यामुळे मी गुरूकुल पद्धती सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षण देवू शकलो. आणखी चांगले विद्यार्थी माझ्या हातून घडावेत, अशी इच्छा ही त्यांनी व्यक्त केली.
हेमंतराजे मावळे म्हणाले, शिक्षक हा संस्कृतीचा उपासक असतो. उत्तम शिक्षणाबरोबर उत्तम नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. परंतु सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी झटून काम करणा-या शिक्षकांचे प्रमाण कमी झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी झटणाºया शिक्षकांचा गौरव करण्याकरीता प्रबोधिनीतर्फे लोक्षशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.
