डान्स बारच्या मुद्द्यावर परब यांचा गृहराज्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल
मुंबई: प्रतिनिधी
गृहराज्यमंत्री योगेश कदम हे डान्स बारमध्ये अश्लील, अनैतिक कृत्य चालत असल्यामुळे नवी मुंबईपर्यंत धाडी टाकायला जातात. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्यांच्या मातोश्रींच्या नावावर सुरू असलेल्या डान्स बारवर कारवाई कोण करणार, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
कदम यांच्या मातोश्रींच्या नावाने चालू असलेल्या बारमध्ये डान्स बार चालवला जात होता. त्यावर दोन वेळा कारवाई करण्यात आली. अश्लील नृत्य सुरू होते. पैसे उडवले जात होते, हे निदर्शनास आले. बारमधील २२ बारबाला, २२ ग्राहक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ही सर्व माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली असून ती खोटी असू शकत नाही, असा दावा परब यांनी केला.
ज्यांच्या नावाने परवाना त्याने…
याबाबत स्पष्टीकरण करताना कदम कुटुंबियांकडून, आपण स्वतः हा बार चालवत नाही तर तो इतरांना चालवायला दिला आहे, असा दावा केला आहे. या संदर्भात सर्व कायदेशीर संदर्भ आपल्याकडे आहेत. बार चालवायला देताना नोकरनामा करावा लागतो. आपण प्राधिकृत केलेल्या व्यक्तीकडून बेकायदेशीर कृत्य घडल्यास ते मूळ मालकाने केल्याचे समजण्यात यावे, असे परब यांनी सांगितले.
कदम कुटुंब ही तोडपाणी गँग
कदम हे राजकीय पदांचा वापर करून ठिकठिकाणी धाडी टाकण्याची कदम कुटुंबीयांची सवय आहे. यांचे सगळे प्रताप बाहेर काढू. प्रदूषण नियंत्रण मंडळात किती धाडी झाल्या, त्याचे पुढे काय झाले, हे सगळे बाहेर काढू. चाकणच्या धाडीत यांचा अधिकार होता का, हे देखील उघड करू, असा इशारा परब यांनी दिला.
… अशी कृत्य करताना शरम पाहिजे
कदम कुटुंबियांकडून, आईचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, आपल्या आईच्या, पत्नीच्या नावाने बारचा परवाना घेऊन तिथे मुली नाचवायला लाज वाटली पाहिजे. यामुळे आपल्या आईची प्रतिमा मलीन होत असल्याची थोडी तरी लाज वाटत असेल तर गृहराज्यमंत्रीपद सोडा, असे परब यांनी योगेश कदम यांना ऐकवले.
