‘ना.धों. महानोर यांच्या कवितांवरील नृत्य कार्यक्रमास चांगला प्रतिसाद
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित ‘ना.धों. महानोर :नृत्य आणि काव्याचा संगम’ या कार्यक्रमाला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. शनीवार ,१६ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला. महानोर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कविता नृत्यप्रकारातून सादरीकरणाचा हा कार्यक्रम तेजदीप्ती डान्स स्कुल तर्फे प्रस्तुत केला गेला. तेजदिप्ती पावडे, राधिका पारकर, रिद्धी तळेकर, अपूर्वा बिराजदार, श्रमिका गायकर, अभिषेक धावडे, अनुभव मिश्रा हे कलाकार सहभागी झाले. तेजदीप्ती पावडे यांचेच दिग्दर्शन होते.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८१ वा कार्यक्रम होता .
निसर्गकवी ना.धो. महानोर यांच्या झिम्माड लयबद्ध कविता आणि गाण्याच्या तितक्याच ठसक्यातील कलाकारांच्या झिम्माड नृत्यावर रसिकांच्या टाळ्यांचा पाऊस पडला .
ना. धो. महानोर यांच्या निसर्गाशी तादात्म्य पावणाऱ्या रचनांवर या नृत्य कलावंतांनी तितकेच लयबद्ध आणि ठसक्यात नृत्य सादर केले. ‘जैत रे जैत ‘ या चित्रपटातील महानोर यांची सर्वच गाणी अतिशय गाजली होती. यातील ‘नभ उतरु आलं, चिंब थरथर झालं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ‘ या ह्रदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतावर अतिशय सुंदर समुह नृत्य कलावंतांनी सादर केले.
‘दोघी’ या चित्रपटातील ‘नागपंचमीच्या सणा, पोरी घालती धिंगाणा’, या आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतावरही अतिशय मोहक नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे रानातलं सौंदर्य आपल्या पारंपरिक शब्दकळांनी खुलवणाऱ्या महानोर यांच्या ‘जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला ‘ हे ‘जैत रे जैत ‘ मधील गाणे, तसेच ‘अजिंठा ‘ चित्रपटातील ‘बगळ्या बगळ्या फुलं दे, पाची बोटं रंगू दे ‘ अशा गीतांवरही तितकीच सुंदर नृत्य सादर झाली. या सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल आवारी यांनी केले.