Monday, September 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर; आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, डिनो मोरिया यांची नावे

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि वरळीचे खासदार आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पंचोली आणि डिनो मोरिया यांच्या नावांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन प्रकरणात संबंधितांचे जबाब नोंदविण्यास सीबीआयला परवानगी दिल्यानंतर तपासाला वेग आला. त्यानंतर सीबीआयने दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून घेतला आणि त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी दिल्ली सीबीआयमधील डीएसपी पुराण सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. सीबीआयकडून आता प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, पोलिस तपासातील नोंदी तसेच संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जाण्याची शक्यता आहे.

सतीश सालियन यांनी आपल्या जबाबात आदित्य ठाकरे आणि अन्य काही व्यक्तींनी कथित कटात तसेच त्यानंतर प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप केल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधित लोकसेवक आणि पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाशी संबंधित कागदपत्रे, फाईल्स आणि सार्वजनिक नोंदी नष्ट किंवा दडपल्या, अधिकृत नोंदींमध्ये फेरफार केला तसेच पोलिस यंत्रणा आणि सार्वजनिक संसाधनांचा कथित गैरवापर केला, अशीही तक्रार त्यांनी केल्याचे सांगण्यात येते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह काही पोलिस अधिकारी, मालवणी पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारी, शवविच्छेदनाशी संबंधित डॉक्टर व कर्मचारी आणि कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांची नावेही जबाबात नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रेजेंट गॅलेक्सी इमारतीतील सुरक्षा रक्षकांसह अनेक व्यक्तींची नावेही जबाबात असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय विशेष तपास पथकातील (एसआयटी) वरिष्ठ अधिकारी आणि कथित सदोष तपासावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. आता सीबीआयने एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाच्या तपासाला निर्णायक वळण मिळाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading