Monday, September 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबईकडे एकटाच जाणार; समर्थकांनी सोबत येऊ नये, मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

जालना  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाण्याच्या निर्णयावर ठाम राहत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (15 सप्टेंबर) अंतरवाली सराटीतून आपण एकट्याने मुंबईकडे रवाना होणार असल्याचे जाहीर केले. समर्थकांनी मोठ्या संख्येने मुंबईकडे येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारकडून सणांच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी नाकारण्यामागे वेगळा डाव असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. आंदोलनात काही लोकांना घुसवून वाद अथवा मारामारी घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि त्याचा दोष मराठा समाजावर टाकला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर आपणही वेगळी रणनीती आखली असल्याचे सांगत जरांगे म्हणाले की, आपण मंगळवारी सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. मात्र यावेळी मोठा ताफा नसेल. आपण स्वतः एका वाहनातून प्रवास करणार असून, गरज पडल्यास दुसरे वाहन सोबत ठेवले जाईल.
आपल्यासोबत दोन रुग्णवाहिका असतील. एखादे वाहन अथवा रुग्णवाहिका बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध राहावी, यासाठी ही खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आपल्या ताफ्यात जास्तीत जास्त चार वाहने असतील आणि पाच ते दहा जणांपेक्षा अधिक कार्यकर्ते सोबत नसतील, असे जरांगे यांनी सांगितले. इतर कार्यकर्त्यांनी सध्या मुंबईला येऊ नये. मुंबईला कधी यायचे, याबाबतचा निर्णय नंतर कळविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये, असे आवाहन करत हा निर्णय समाजाच्या हितासाठी आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी महत्त्वाचा असल्याचे जरांगे यांनी सांगितले. मुंबईकडे जाण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत बदलणार नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
“मुंबईला जायचे आहे, या निर्णयात कोणताही बदल नाही. प्रसंगी जीव धोक्यात घालण्याची वेळ आली तरी दिलेला शब्द मागे घेणार नाही. मराठा समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही,” असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading