Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

समाज धर्मसत्तेकडे नेला जात आहे : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : ज्ञानसत्तेऐवजी समाज धर्मसत्तेकडे नेला जात आहे. ज्ञानसत्ता प्रश्न विचारते तर धर्मसत्ता संप्रदाय तयार करते; जो प्रश्न विचारत नाही. ज्ञानसत्तेचा दरारा कमी का झाला आहे या विषयी चिंतन होणे आवश्यक असून ज्या समाजात शिक्षकांना स्थान नाही त्या समाजाचे अध:पतन होते, असे परखड मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. डॉ. फडकुले यांच्याकडे समाजाने फक्त वक्ते म्हणून पाहिले; परंतु त्यांनी ज्या गांभीर्याने लेखन केले त्याकडे आपले दुर्लक्ष झाले असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, वक्ते, विचारवंत स्व. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा स्मृतिदिन आणि डॉ. फडकुले यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण आज (दि. 16) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डॉ. माधवराव पटवर्धन सभागृहात झाले. पुरस्कारांचे वितरण अंमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्रा. जोशी अध्यक्षपदावरून बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर, कार्याध्यक्ष उद्धव कानडे, प्रमुख कार्यवाह रवींद्र डोमाळे व्यासपीठावर होते.

डॉ. निर्मलकुमार फडकुले जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, कवी, समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांना, संत साहित्य पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विजय लाड यांना, लोकहितवादी पुरस्कार स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे आणि साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी यांना तर साहित्य पुरस्कार डॉ. जगदिश कदम लिखित ‌‘ऐसी कळवळ्याची जाती’ या कवितासंग्रहास, डॉ. संदीप सांगळे लिखित ‌‘मध्ययुगीन दलित संतकविता : सामाजिक व वाङ्मयीन मूल्यमापन’ या ग्रंथास तसेच ‌‘पत्नीपुराण’ या ग्रंथासाठी डॉ. रवींद्र तांबोळी यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि सोलापुरी चादर असे पुरस्काराचे स्वरूप होते.
संस्थेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांनी पुरस्कार सोहळ्याची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
प्रा. जोशी पुढे म्हणाले, शेवाळकर, डॉ. फडकुले, कुरुंदकर या शिक्षकांनी वर्गाच्या भिंतीपलिकडे जाऊन शिकविले ज्यामुळे ते लोकशिक्षक झाले. आजच्या काळात शिक्षक हा लोकशिक्षक होताना दिसत नाही ही खंत आहे. शिक्षकांनी लोकशिक्षक होण्यासाठी स्वत:च्या पात्रतेची इयत्ता वाढविणे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, नर्मविनोद हा डॉ. फडकुले यांच्या भाषणाचा एक भाग होता. ते पुढे म्हणाले, पुरस्काराची संस्कृती लेखकांना बळ देणारी असते. सध्या समाजात चिंता, काळजीचे वातावरण आहे. शिक्षकांना नोकरीसाठी देणगी द्यावी लागते हे भीषण चित्र सध्या समाजात दिसत आहे. शिक्षण क्षेत्रात कुरूपता पसरली आहे. या विषयी व्यक्त होणे हा लेखकाचा धर्म आहे.
कृष्णकुमार गोयल यांनी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
जीवनगौरव पुरस्काराला उत्तर देताना डॉ. मनोहर जाधव म्हणाले, डॉ. फडकुले हे साहित्यिक, उत्तम माणूस तर होतेच परंतु ते उत्तम शिक्षकही होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. शिक्षणासारख्या मुलभूत क्षेत्रात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या सामाजिक स्थितीत उच्चविद्याविभूषितांना शैक्षणिक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत या परिस्थितीचे दु:ख वाटते. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचा सत्कार सचिन ईटकर, रवींद्र नेमाडे, बाळसाहेब बाणखेले यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading