Monday, August 31, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेल्या संपाचा पीएमपीच्या बससेवेवर परिणाम नाही

पुणे :  २५ व २६ ऑगस्ट २०२३ रोजी ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील कोथरूड, पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस वरील चालकांनी प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आडमुठे धोरण स्वीकारून संप पुकारला आहे.
तथापि ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी पुकारलेल्या संपाचा पीएमपी च्या बससेवेवर कोणताही परिणाम होवू नये यासाठी प्रशासनाने महामंडळाकडील चालक खासगी बसेसवरती नेमून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालक यांच्या असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाकडून नियमित मार्गस्थ होणारे जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
खासगी बस ठेकेदाराकडील चालकांच्या संपामुळे पीएमपीएमएल च्या बससेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे खालील तपशीलावरून दिसून येते.

अ.क्र. दिनांक मार्गावरील बसेसची संख्या प्रवाशी संख्या उत्पन्न
१ २४/०८/२०२३ १७०५ १३,४५,०९१ १,८८,९७,९२२
२ २५/०८/२०२३ १६०२ १३,००,७४९ १,७८,२४,२२०

परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी संपकाळात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच साप्ताहिक सुट्टी असताना देखील जे चालक, वाहक व वर्कशॉप कर्मचारी कामावर रुजू झाले त्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.
व या बससेवेवर सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी पुकारलेल्या संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळून प्रवाशी सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी पीएमपीएमएल कडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरम्यान कोथरूड डेपोकडील ट्रॅव्हलटाईम च्या चालकांचा संप मिटला आहे. मात्र ट्रॅव्हलटाईम या ठेकेदाराकडील पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील चालकांनी संप मागे न घेतल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०२३ चे कलम २ चा खंड (क) चा उपखंड (एक) व (पाच) यासह कलम ४ चे पोट-कलम (१) मधील तरतुदीच्या अधीन राहून या कंत्राटी चालक कर्मचाऱ्यांच्या संपास दिनांक २६ ऑगस्ट २०२३ पासून मनाई करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading