संस्कृत बँड ‘गन्धर्वसख्यम् ‘ ने जिंकली मने!
पुणे: ‘श्रावण श्राव्या’ ही संकल्पना घेऊन आलेल्या पुण्यातल्या पहिल्या संस्कृत बँड(वृंद) ‘गन्धर्वसख्यम् ‘ने शनिवारी रसिकांची मने जिंकली. आगामी संस्कृत दिनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘गंधर्व सख्यम ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.
संस्कृतश्री निर्मित ‘गंधर्वसख्यम्’ या संस्मरा (संस्कृत – मराठी) भाषेतली म्युझिकल मधील निवडक गीते यावेळी ‘वृंद गन्धर्वसख्यम्’ ने सादर केली. पहिल्या भागात भजेहं गजवदनं, मनसो मे मोहिनी, अभिन्ना भव, रञ्जय माम् सखि हे इत्यादि गीते संस्कृत-मराठी आणि संस्कृत – हिंदी अशा दोन्ही भाषांत सादर करण्यात आली.
खुमासदार निवेदन आणि अभिजात सुभाषितांचे उल्लेख करत करत कार्यक्रमास रंगत आणण्यात आली. दुसऱ्या भागात संस्कृतश्री च्या यू ट्यूब चॅनल वरील लोकप्रिय गीतांच्या संस्कृत भावानुवादांचे सादरीकरण झाले. आता गं बया का बावरलं, मधुमास नवा, मच गया शोर इत्यादि गीतांचे संस्कृत भावानुवाद सादर झाले. जोशपूर्ण अशा ‘जयदिह महाराष्ट्र राज्यम्’ या गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
आजची तरुण पिढी कोरियन बँड्स ची गीते तसेच अनेक दाक्षिणात्य भाषांतील गीते ऐकत असते. त्यातील शब्द कळत नसतानाही ती गाणी गुणगुणली जातात.अशा वेळी सर्व भारतीयांचा सामायिक वारसा असलेल्या संस्कृत भाषेत देखील तरुणाईला आवडतील अशी हलकी-फुलकी आणि सुमधुर प्रेमगीते तयार होऊ शकतात, हे दाखवून देण्याकरिता या म्युझिकल ची निर्मिती करण्यात आली अशी भूमिका श्री प्रांजल आणि डॉ. श्रीहरी यांनी मांडली .
‘गन्धर्वसख्यम्’चे संगीत दिग्दर्शन आणि गीतांचे सादरीकरण प्रांजल अक्कलकोटकर यांनी केले. संस्कृत गीतकार प्रा.डॉ.श्रीहरी गोकर्णकर यांनी आणि प्रांजल या दोघांनी निवेदनाची बाजू सांभाळली. याचसोबत सानिका जोशी ( गायन), सई जोशी (की बोर्ड), रोहित शिळीमकर (तबला) आणि प्रतिक देशपांडे ( गिटार) यांनी उत्तम साथसंगत केली. प्रज्ञा प्रभुदेसाई (पट व्यवस्था) , तुषार बोरोटीकर (प्रोजेक्टर), स्वप्नील जोशी आणि (ईको रिगेन) यांचे निर्मिती, सहाय्य होते कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.