Wednesday, May 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

शुभ्रा खाडे ठरली मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ ची महाविजेती

स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. वीरा हाक्के, शुभ्रा खाडे, अस्मिता गादेकर, अर्णव बोपलकर, ईशानी हिंगे आणि गंधर्व चामनर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत कोल्हापूरच्या शुभ्रा खाडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. शुभ्रा खाडेला तीन लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. तर द्वितीय क्रमांक पटकावला नांदेडच्या वीरा हाक्केने. तृतीय क्रमांक नाशिकच्या अस्मिता गादेकर आणि ठाण्याचा अर्णव बोपलकर यांना विभागून देण्यात आला. तर पुण्याची ईशानी हिंगे आणि गंधर्व चामनर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं.

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुभ्रा खाडे म्हणाली, ‘हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या रुपात नव्या पाढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखिल मी ऋणी आहे.’

शुभ्रा खाडे जरी या पर्वाची विजेती असली तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. या कार्यक्रमाने एक नाही तर सहा सुपरस्टार महाराष्ट्राला दिले आहेत. या सर्व स्पर्धकांच्या पुढील वाटचालीसाठी स्टार प्रवाह परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading