NCDEX IPFT कडून पुणे येथे दोन दिवसाच्या गुंतवणूकदार जागरूकता कार्यशाळेचे आयोजन
पुणे : एनसीडीईएक्सने आपल्या इन्वेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्ट (IPFT) अंतर्गत, इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ सेक्यूरिटीज कमिशन (IOSCO) च्या जागतिक गुंतवणूकदार आठवडा (World Investor Week) २०२६ च्या निमित्ताने पुणे येथे ६ आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवसांच्या गुंतवणूकदार जागरूकता कार्यशाळेचे आयोजन केले. या सत्रांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना डिजिटल फसवणूक (scams), अफवा आणि निश्चित परताव्याच्या आश्वासने यांची ओळख कशी करावी, तसेच सुरक्षित गुंतवणुकीसाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील कमोडिटी व्यापाराचे व्यावहारिक उदाहरण देत नियमनबद्ध आणि पारदर्शक बाजारपेठ कशा प्रकारे कार्य करते, हेही समजावून सांगण्यात आले.
जागतिक गुंतवणूकदार आठवडा हा इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ सेक्यूरिटीज कमिशन (IOSCO) च्या नेतृत्वाखाली राबविला जाणारा जागतिक उपक्रम असून, त्याचा उद्देश गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि संरक्षण यांना प्रोत्साहन देणे हा आहे. गुंतवणूकदारांची जोखीम-सहनक्षमता (Investor Resilience), डिजिटल फसवणूक (Digital Deception) आणि फसवणुकीपासून सावधानता (Scam Alert) हे यावर्षीचे प्रमुख विषय आहेत. जागतिक गुंतवणूकदार आठवडा २०२६ च्या निमित्ताने एनसीडीईएक्स आयपीएफटीने स्वतःच्या पुढाकारातून या कार्यशाळेचे आयोजन केले.
कार्यशाळेच्या उद्देशाविषयी बोलताना एनसीडीईएक्सचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री. केदार देशपांडे म्हणाले, “गुंतवणूकदारांचे संरक्षण जागरूकतेपासून सुरू होते. नियमनबद्ध बाजारपेठांमधील सहभाग सातत्याने वाढत असताना, गुंतवणूकदारांनी पूर्ण माहिती घेणे, योग्य प्रश्न विचारणे आणि ऐकायला खूपच आकर्षक किंवा अवास्तव वाटणाऱ्या ऑफर्सपासून दूर राहणे आवश्यक आहे. व्यवहारातील समोरच्या पक्षाची पडताळणी करणे, करारपत्र (Contract Note) प्राप्त करणे आणि निश्चित परताव्याच्या योजनांपासून दूर राहणे ही बचत सुरक्षित करण्यासाठीची सोपी आणि प्रभावी पावले आहेत. जागतिक गुंतवणूकदार आठवडयाच्या निमित्ताने ही चर्चा घडवून आणताना, गुंतवणूकदार आणि शेतकरी यांच्यातील जागरूकता अधिक बळकट करणे हा आमचा उद्देश आहे, ज्यामुळे ते अधिक आत्मविश्वासाने आणि सुरक्षिततेने बाजारपेठांमध्ये सहभागी होऊ शकतील.”
सत्रांमधील प्रमुख मुद्दे
- फसवणुकी या निश्चित परताव्याचे आश्वासन देतात; परंतु बाजारपेठा ते कधीही देऊ शकत नाहीत. निश्चित परतावा, महत्वाच्या टिप्स आणि अफवा— यामध्ये सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सद्वारे येणाऱ्या फसवणुकीच्या धोक्याचे ठळक संकेत आहेत.
- विश्वास ठेवण्यापूर्वी पडताळणी करा. केवळ एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत असलेल्या सदस्यांमार्फतच व्यवहार करा. अशा सदस्यांची यादी एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. अनधिकृत मध्यस्थांमार्फत किंवा बाजाराबाहेर (ऑफ-मार्केट) व्यवहार केल्यास गुंतवणूकदारांना एक्सचेंजच्या संरक्षणाचा लाभ मिळत नाही.
- कागदपत्रांची कार्यवाही म्हणजे संरक्षण. प्रत्येक व्यवहारासाठी स्वाक्षरी केलेले करारपत्र (Contract Note), जोखीम प्रकटीकरण निवेदन (Risk Disclosure Statement) आणि खात्याच्या विवरणपत्रांची नियमित तपासणी केल्यास विसंगती लवकर लक्षात येण्यास मदत होते आणि केलेल्या व्यवहारांची पडताळणी एक्सचेंजच्या वेबसाइटवरही करता येते.
- जोखीम व्यवस्थापन केवळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी नाही. जगभरातील व्यावसाईक संस्था आणि सरकारेदेखील किंमतीच्या चढ-उतारांमुळे होणाऱ्या महागड्या परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी या साधनांचा वापर करतात.
- जागरूकता हेच सर्वोत्तम संरक्षण आहे. बाजारपेठ कशी कार्य करते याची माहिती असल्यास दिशाभूल करणारे दावे नुकसान करण्यापूर्वीच ओळखणे अधिक सोपे होते.
गुंतवणूकदारांनी काय करावे आणि काय करू नये :
काय करावे:
- केवळ एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत सदस्यांमार्फतच व्यवहार करा आणि त्यांची नोंदणी एक्सचेंजच्या वेबसाइटवर तपासून घ्या.
- प्रत्येक व्यवहारासाठी स्वाक्षरी केलेले करारपत्र (Contract Note) आणि जोखीम प्रकटीकरण निवेदन (Risk Disclosure Statement) घेण्याचा आग्रह धरा.
- आपल्या खात्याच्या विवरणपत्रांचा नियमित ताळमेळ करून घ्या आणि कोणतीही विसंगती आढळल्यास ती त्वरित निदर्शनास आणून द्या.
- मार्जिन आणि मार्क-टू-मार्केट (Mark-to-Market) संबंधित देयके वेळेवर भरा.
काय करू नये:
- अफवा, महत्वाच्या टिप्स किंवा निश्चित परताव्याचे स्रोत किंवा प्लॅटफॉर्म कितीही विश्वासार्ह वाटत असले तरी अशा आश्वासनांवर विश्वास ठेवून कृती करू नका.
- नोंदणीकृत नसलेल्या मध्यस्थांमार्फत किंवा बाजाराबाहेरील (ऑफ-मार्केट) व्यवहार करू नका.
- डब्बा ट्रेडिंगच्या जाळ्यात अडकू नका.
- आपल्या क्षमतेच्या पलीकडे जोखीम वाढू देऊ नका.
