अंधभक्ती हाच देशा समोरील मोठा धोका: कन्हैय्याकुमार
पुणे : महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे आयोजित तीन दिवसीय ‘फुले फेस्टिवल’चे शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सोनचाफ्याची फुले उधळून थाटात उद्घाटन झाले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी, विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांच्या हस्ते फुले दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष अजित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास अभिनेते अतुल कुलकर्णी, माजी मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष फैयाज शेख, समाजवादी नेते कपिल पाटील, डॉ.अभिजीत वैद्य ,माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रा.शरद बाविस्कर ,राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर, लक्ष्मण माने, दासू वैद्य , राजन गवस,कंचना यादव, मोहंमद इरफान, श्रीपाद हळबे ,किशोर ढमाले ,बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते
उद्घाटन सोहळ्याला विद्यार्थी, युवक, साहित्यप्रेमी, कलाकार आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उद्घाटन सोहळ्याआधी शिक्षक साहित्य संमेलन अध्यक्ष दासू वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
फुले वॉक, विद्रोही साहित्यावर चर्चा, पुस्तक जत्रा, प्रकाशने, शिक्षक साहित्य संमेलन, अंनिस दालनात जादूचे प्रयोग, २०० लोक कलावंतांचे सादरीकरण, लयलूट खाद्य संस्कृतीची ही फेस्टिवलची विशेष आकर्षणे आहेत.
फुले यांच्या अखंड गायनाने आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कवन गायनाने सुरुवात झाली. अरुण म्हात्रे यांनी सूत्र संचालन केले.
कन्हैय्याकुमार म्हणाले, ‘सांस्कृतिक लढाई या फेस्टिव्हलद्वारे सुरु झाली आहे . आर्थिक वर्चस्ववाद सर्व क्षेत्रात घुसला आहे . वैचारिक पूर्वज यांचे विचार यांचे उत्सव केले पाहिजेत. ‘ अलबेले प्रधानमंत्री ‘ असा पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करून ते म्हणाले भक्त संप्रदाय वाढला असून अंधभक्त निर्मूलन समिती स्थापना करण्याची गरज आहे. अंधभक्ती हाच देशा समोरील मोठा धोका आहे.सर्व प्रकारचे भेद विसरून त्यामुळे होणारा त्रास दूर केला पाहिजे.लोकशाही टिकविण्याची गरज आहे . संविधानाचे मूलभूत विचार जपण्याची गरज आहे , असेही ते म्हणाले .विविधता जपण्याची गरज आहे . भारतीय म्हणून योगदान दिले पाहिजे.मोनोपॉलीने विचार मारले जात आहेत.
डॉ.गणेश देवी म्हणाले ‘ फुले फेस्टीव्हल प्रत्यक्षात आलेला पाहताना आनंद होत आहे. म.फुले, सावित्रीबाई यांच्या सारखे काम कोणी केले नाही.आता वोटचोरी , चंदा चोरी सुरू आहे . नागरिकत्व सिद्ध करावे लागत आहे . गरीब श्रीमंत दरी वाढत आहे . अशा काळात सेवादलाला ताकद जिवंत ठेवून , वाढवून देशभर कार्यरत राहिले पाहिजे . अराजकाचा धोका डॉ. आंबेडकर यांनी वर्तवला होता. राजकारणातील भक्तांनी राजकारण , लोकशाही आणि संविधानाची वाट लावली . आता प्रचंड ताकदीचा लोकशाहीचा मोर्चा उघडण्याची गरज आहे . लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करण्याची गरज आहे.
अभिनेते अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘महापुरुषांचे कार्य पूर्ण झाले का याचा विचार केला पाहिजे .ते पूर्ण झाले नसेल तर या महापुरुषांना पृथ्वीवर पुन्हा पुन्हा यावे ,असे का वाटते याचा विचार केला पाहिजे . त्यांना समाधान वाटेल असे काम आपण सर्वांनी केले पाहिजे.
रघुवीर खेडकर, सुरेखा पुणेकर, पृथ्वीराज माळी यांचा महाजलसा रंगला –
कला, साहित्य, संस्कृती, विचार, संगीत आणि सामाजिक प्रबोधन यांचा अनोखा संगम असलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात पहिल्या दिवशी सायंकाळी ७:३० वाजता ‘महाजलसा-लोकलावंतांची संगीतबारी’ हा लोककलावंतांच्या संगीताचा विशेष कार्यक्रम सादर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील लोकसंगीत आणि लोककलांचे विविध रंग अनुभवता आले. रघुवीर खेडकर, सुरेखा पुणेकर, कडुबाई खरात, चंदन कांबळे, शीतल साठे, सचिन माळी, देवानंद माळी, पृथ्वीराज माळी, सदाशिव निकम, प्रकाश फरांदे आदी सहभागी झाले. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा जागर करणे, नव्या पिढीपर्यंत परिवर्तनवादी विचार पोहोचवणे आणि विविध कलाप्रकारांना मंच उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा उद्देश पहिल्याच दिवशी साध्य झाल्याचे चित्र दिसले.
