लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळे
बाबुराव शेवाळे दवाखान्यात कॅन्सर डायग्नोस्टिक सपोर्ट सेंटरचे भूमिपूजन
पुणे : लोकप्रतिनिधींनी आत्मीयतेने, नियोजनपूर्वक आणि जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा सर्वांगीण कायापालट करणे शक्य आहे. औंध-बोपोडी परिसरातील लोकप्रतिनिधींनी एकदिलाने काम करून याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे, असे कौतुकोद्गार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी काढले.
बाबुराव शेवाळे दवाखान्यात उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर डायग्नोस्टिक सपोर्ट सेंटरचे भूमिपूजन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, भक्ती गायकवाड, आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे, डॉ. झिम्रा इस्राएल, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, आरपीआयचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, प्रियांका मेहरा, विलास जाधव यांच्यासह महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
औंध-बोपोडी परिसरातील तीन रुग्णालयांचे आधुनिकीकरण करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल शिरोळे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष कौतुक केले. तसेच परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेता येथे ट्रॉमा सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व नगरसेवकांनी सामूहिक नेतृत्व आणि समन्वयातून विकासकामे हाती घेतल्यामुळे परिसराचा कायापालट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या परिसरात नियोजित कॅन्सर डायग्नोस्टिक सपोर्ट सेंटरमुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले. परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपूल, जागतिक दर्जाचे हॉकी स्टेडियम यांसह विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. प्रभागातील विकासकामांसाठी ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
वाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या या केंद्रात कर्करोगाचे निदान आणि उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे डॉ. झिम्रा इस्राएल यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेऊन अकारण आक्रमक भूमिका न घेता समन्वयातूनही उत्तम काम करता येते, हे औंध-बोपोडीतील नगरसेवकांनी दाखवून दिले आहे, असे आरोग्य अधिकारी मीना बोराडे यांनी सांगितले. सर्व नगरसेवकांच्या सहकार्यामुळे प्रभागात रुग्णसेवेचे काम प्रभावीपणे राबविता येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. ज्ञानेश्वर जावीर यांनी केले तर माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.
