Wednesday, November 25, 2026
Latest NewsPUNE

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्तर्फे राज्यस्तरीय संगीत व नृत्य करंडक



प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर संगीत व नृत्य करंडक ; दि. ४ आणि ५ डिसेंबर रोजी आयोजन

    पुणे : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, संगीत आणि नृत्य क्षेत्रातील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच भारतीय कला आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सृजनसभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर संगीत व नृत्य करंडक राज्यस्तरीय आंतरशालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धा ४ आणि ५ डिसेंबर २०२६ रोजी नऱ्हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, कॅम्पस १, जाधवर चौक, मानाजीनगर येथे होणार आहेत.

    पत्रकार परिषदेला होनराज मावळे उपस्थित होते. शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समूहगीत गायन स्पर्धा होणार असून, त्यासाठी देशभक्तीपर गीत हा विषय निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये १० ते १२ वर्षे (इयत्ता पाचवी ते सातवी), १३ ते १५ वर्षे (इयत्ता आठवी ते दहावी) आणि १६ ते १७ वर्षे (इयत्ता अकरावी व बारावी) असे तीन वयोगट असतील. याच दिवशी छोटा ख्याल गायन स्पर्धा (एकल) होणार असून, त्यात १८ ते २१ वर्षे महाविद्यालयीन गट आणि २२ ते ३० वर्षे खुला गट असे दोन गट असतील.

    शनिवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समूह नृत्य स्पर्धा होणार आहे. यामध्ये १० ते १२ वर्षे (इयत्ता पाचवी ते सातवी), १३ ते १५ वर्षे (इयत्ता आठवी ते दहावी) आणि १६ ते १७ वर्षे (इयत्ता अकरावी व बारावी) असे तीन वयोगट असतील. स्पर्धकांना देशभक्तीपर गीत या विषयावर नृत्य सादर करता येईल. तर १८ ते २१ वर्षे वयोगटासाठी आणि २२ ते ३० वर्षे खुल्या गटासाठी शास्त्रीय नृत्य / महाराष्ट्रीय लोकनृत्य या प्रकारांमध्ये सहभाग घेता येईल.

    वयवर्षे १० ते १७ या वयोगटातील स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांकास पाच हजार रुपये व मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास तीन हजार रुपये व मानचिन्ह, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये व मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच १८ ते ३० वर्षे वयोगटातील स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांक आठ हजार रुपये व मानचिन्ह, द्वितीय क्रमांक सहा हजार रुपये व मानचिन्ह, तृतीय क्रमांक चार हजार रुपये व मानचिन्ह, तसेच उत्तेजनार्थ मानचिन्ह अशी पारितोषिके असतील. प्रत्येक गटात चार क्रमांक व चार पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, दि. ९ डिसेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    Leave a Reply