Wednesday, November 25, 2026
Latest NewsPUNE

डीकेएमएस फाउंडेशन तर्फे पुण्यात रक्तातील स्टेम सेल दात्यांचा केला सन्मान

पुणे : रक्तातील स्टेम सेल दानाच्या प्रत्येक यशस्वी प्रक्रियेमागे दात्याची असामान्य दातृत्वाची भावना असते. पुण्यातील काही व्यक्तींनी आपल्या स्टेम सेलचे दान करण्याचा निर्णय घेऊन जीवघेण्या आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी दिली. या व्यक्तींच्या प्रेरणादायी योगदानाची दखल घेण्यासाठी डीकेएमएस फाउंडेशन इंडियातर्फे आज पुण्यात स्टेम सेल दात्यांच्या सन्मानाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गरजू रुग्णांसाठी आपल्या रक्तातील स्टेम सेलचे दान करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पुण्यातील दात्यांचा सन्मान हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. पुण्यातील नीरज शेट्टी आणि गितेश अगरवाल तसेच मुंबईतील हिमांशू शर्मा हे स्टेम सेल दाते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या चर्चेदरम्यान, प्रत्यारोपणासाठी रुग्णाचे वेळेत वैद्यकीय मूल्यमापन करणे, योग्य दाता शोधणे तसेच प्रत्यारोपण केंद्रे आणि दात्यांची नोंदणी करणाऱ्या संस्था यांच्यातील समन्वय सुधारणे यांचे महत्त्व वैद्यकीय तज्ज्ञांनी अधोरेखित केले. पर्यायी दात्यांकडून स्टेम सेल घेऊन प्रत्यारोपण करण्याच्या उपचारपद्धतीत झालेल्या प्रगतीबाबतही तज्ज्ञांनी चर्चा केली. संभाव्य स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी केल्यानंतर आपल्यावर कोणती जबाबदारी असते, याबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

डीकेएमएस फाउंडेशन इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष पॅट्रिक पॉल म्हणाले ‘संभाव्य स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी करणे हे एक महत्त्वाचे पहिले पाऊल आहे. मात्र, गरजेच्या वेळी स्टेम सेल दान करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्यास रुग्णाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवता येऊ शकतो. अशा उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना स्टेम सेल दानाचे महत्त्व समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, आपल्यावर अवलंबून असलेल्या संभाव्य रुग्णांना मदत करण्याच्या निर्णयावर त्यांनी ठाम राहावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश आहे.’

पुण्यातील स्टेम सेल दाते गितेश अग्रवाल म्हणाले, “मी त्या रुग्णाला ओळखत नव्हतो. मात्र, माझ्या स्टेम सेल दानामुळे एखाद्या व्यक्तीला आशेचा किरण दिसू शकतो, ही जाणीवच माझ्यासाठी पुरेशी होती. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे.”

सह्याद्री हॉस्पिटल्सचे रक्ताच्या कर्करोगावरील उपचार आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहाने म्हणाले, विशिष्ट प्रकारचे रक्ताचे कर्करोग आणि गंभीर रक्तविकार असलेल्या मुलांसाठी इतर उपचार पुरेसे ठरत नसतील, तर स्टेम सेल प्रत्यारोपणाच्या माध्यमातून आजार पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते. मात्र, रुग्णाच्या आजाराचे निदान, त्याची एकूण आरोग्यस्थिती आणि योग्य दात्याची उपलब्धता या बाबींचा काळजीपूर्वक विचार करून निवडक रुग्णांनाच प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. प्रत्यारोपणासाठी रुग्णाचे लवकर वैद्यकीय मूल्यमापन करणे आणि वेळेत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होणे, या बाबींमुळे उपचारांच्या परिणामांमध्ये लक्षणीय फरक पडू शकतो.

ज्युपिटर हॉस्पिटलच्या रक्तविकार, रक्ताचा कर्करोग आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण विषयातील सल्लागार तज्ज्ञ डॉ. श्वेता लुंकड म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांत स्टेम सेल प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली आहे. उपचारांच्या परिणामांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे रक्ताचा कर्करोग आणि इतर गंभीर रक्तविकार असलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.

Leave a Reply