शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर
पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शेकडो दिव्यांनी उजळले. मंदिरातील गाभारा, सभामंडप सह कळसापर्यंत प्रज्वलित केलेल्या हजारो दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर उजळून निघाले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, बळीराजावर जे संकट आले आले, ते दूर होवो आणि महाराष्ट्र व संपूर्ण भारतात सुख-शांती नांदो अशी प्रार्थना यावेळी गणरायाचरणी करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त साकारलेल्या अन्नकोटामध्ये तब्बल ५५१ हून अधिक प्रकारचे पदार्थ मांडण्यात आले होते.
