एकल महिलांना ‘अभया’ म्हणून संबोधावे ; शासकीय कागदपत्रांतही या शब्दाचा वापर व्हावा
पुणे : राष्ट्रीय महिला आयोगाच्या पुढाकाराने नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ‘भारतातील एकल महिलांचे हक्क आणि आव्हाने’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात वंचित विकास संस्थेने सहभाग घेत एकल महिलांच्या सन्मानजनक ओळखीचा आणि त्यांच्या हक्कांचा मुद्दा मांडला. संस्थेच्या वतीने डॉ. श्रीकांत गबाले यांनी चर्चासत्रात भूमिका मांडली, अशी माहिती वंचित विकासच्या मीना कुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मीना कुर्लेकर, डॉ. श्रीकांत गबाले, सुनिता जोगळेकर, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.
दिल्ली येथे झालेल्या चर्चासत्राला कर्नाटकच्या राज्यपाल डॉ. सुधा यादव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषवले. आयोगाचे सदस्य सचिव सुदीप जैन यांचीही उपस्थिती होती. देशाच्या विविध भागांतील महिला संघटना, सामाजिक संस्था, विद्यापीठे व महाविद्यालयांचे प्रतिनिधी, अभ्यासक, कार्यकर्ते तसेच विधी, वित्त व कामगार क्षेत्रांतील शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
विधवा, परित्यक्ता, नवऱ्याने सोडलेल्या किंवा विविध कारणांमुळे एकट्याने जीवन जगणाऱ्या महिलांना ‘एकल महिला’ किंवा ‘परित्यक्ता’ अशा संज्ञांऐवजी निर्भयपणे परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या स्त्रीचा सन्मान व्यक्त करणारा ‘अभया’ हा शब्द वापरावा. तसेच शासकीय व अधिकृत कागदपत्रांमध्येही या शब्दाचा समावेश करावा, अशी मागणी डॉ. श्रीकांत गबाले यांनी केली.
महिलांना विधवा, परित्यक्ता, एकटी बाई, नवऱ्याने सोडलेली, बिना लग्नाची किंवा मुले नसलेली अशा संज्ञांनी संबोधल्याने त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. या महिलांशी महाराष्ट्रभर संवाद साधल्यानंतर त्यांना सन्मान देणारी पर्यायी संज्ञा असावी, अशी भावना पुढे आली. त्यातूनच ‘अभया’ हा शब्द समोर आला. अभया म्हणजे न घाबरता परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाणारी स्त्री. या संकल्पनेला महाराष्ट्रातील महिलांचा पाठिंबा असून, त्यासंदर्भातील सह्या आणि लेखी पत्रेही संस्थेकडे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांनाही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
वंचित विकास ही गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात विविध सामाजिक घटकांतील महिलांसाठी काम करणारी संस्था आहे. संस्थेचे संस्थापक कै. विलास चाफेकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या कार्यात सर्व जातीधर्मांतील, विविध वयोगटांतील आणि आर्थिक स्तरांतील महिलांचा समावेश आहे. विधवा, परित्यक्ता, नवऱ्याने सोडलेल्या, अविवाहित, आदिवासी तसेच शहरी व ग्रामीण भागांतील वंचित महिलांसाठी संस्था काम करते. मे २०१४ पासून संस्थेने एकल महिलांच्या प्रश्नांवर स्वतंत्र प्रकल्पाच्या माध्यमातून काम सुरू केले आहे.
संस्थेच्या ‘सबला महिला केंद्रा’च्या माध्यमातून गेल्या चार दशकांतील कामाचा आढावा घेत डॉ. गबाले यांनी एकल महिलांसाठीच्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची आवश्यकता व्यक्त केली. राष्ट्रीय स्तरापासून तालुका स्तरापर्यंत स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारून महिलांना कायदेशीर सहाय्य, रोजगार, आर्थिक स्वावलंबन, सुरक्षित निवास, मालमत्ता व वारसाहक्क आणि सामाजिक सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या.
चर्चासत्रात दोन तांत्रिक सत्रे झाली. पहिल्या सत्रात एकल महिलांचे हक्क, विद्यमान कायदेशीर तरतुदी, केंद्र सरकारच्या योजना आणि विविध राज्यांतील कार्यपद्धती यांवर चर्चा झाली. दुसऱ्या सत्रात एकल महिलांना प्रत्यक्ष भेडसावणाऱ्या समस्या, योजनांचा लाभ घेताना येणारे अडथळे आणि त्यावरील उपाय यांवर विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मते मांडली. सर्व राज्यांसाठी समान उद्दिष्टे आणि किमान सेवा निकष असणारे राष्ट्रीय धोरण तयार करताना स्थानिक गरजांनुसार अंमलबजावणीची पद्धत ठरवण्याचे स्वातंत्र्य राज्यांना असावे, असा विचारही मांडण्यात आला.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी चर्चासत्रातील विविध मुद्द्यांवर आयोगाच्या कामाची दिशा स्पष्ट केली. डॉ. गबाले यांनी मांडलेल्या ‘अभया’ संकल्पनेची त्यांनी दखल घेतली. वंचित विकास संस्थेने गेल्या वर्षी आयोजित केलेली राज्यस्तरीय ‘अभया’ कार्यशाळा उत्तम प्रकारे पार पडल्याचेही त्यांनी उपस्थितांसमोर नमूद केले.
समारोपप्रसंगी कर्नाटकच्या राज्यपाल डॉ. सुधा यादव यांनी एकल महिला म्हणून स्वतःचा जीवनप्रवास मांडला. स्त्रीची ओळख आणि भविष्य तिच्या वैवाहिक स्थितीवरून ठरू नये, असे त्यांनी अधोरेखित केले. ‘एकल महिला’ आणि ‘परित्यक्ता’ या संज्ञांसाठी पर्यायी शब्दांचा विचार व्हावा, असेही त्यांनी सूचित केले.
एकल महिलांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि त्यांचा लाभ घेता यावा, यासाठी वंचित विकास संस्था प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मार्गदर्शन व मदतीसाठी संस्थेच्या ९३७०८२५३६८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मीना कुर्लेकर यांनी केले आहे.
