जहांगीर गॅलरीत “व्हिस्पर्स ऑफ द वाइल्डरनेस”
मुंबई : समकालीन चित्रकर्ती विनिता सदारंगानी यांचे “व्हिस्पर्स ऑफ द वाइल्डरनेस” हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई येथे दि ८ ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत सर्व कलारसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.

विनिता सदारंगानी आपल्या “व्हिस्पर्स ऑफ द वाइल्डरनेस” या प्रदर्शनाच्या माध्यमातून निसर्ग आणि कला प्रेमींना निसर्गाच्या अद्भुत सौन्दर्याचे दर्शन घडवतात. विनिता यांनी आपल्या कालाकृतीसाठी इम्प्रेशनिस्ट शैलीतून प्रेरणा घेतली असली तरी त्यांची चित्रे ही एक नवीन स्वतंत्र शैलीला जन्म देतात. त्यांच्या चित्रांमध्ये इम्प्रेशनिस्ट आणि ॲबस्ट्रॅक्ट दोन्ही शैलींचा सुमधुर संगम पाहता येतो.

विनिता यांची बहुतांश चित्रे ही ॲक्रिलिक माध्यमातील आहेत. निसर्गातील विशेषतः अरण्यातील घनदाट वृक्षांना त्यांनी नवीन परिप्रेक्ष्यातून कॅनव्हासवर मांडले आहे. त्यामुळे रंग, ब्रश यांच्या फटकाऱ्यातून एक नवीन अर्थ सांगू पाहणारी ही चित्रे कला रसिकांसमोर चित्ररूपी कविताच सादर करतात. शांत, मनाला आनंद देणारं हे प्रदर्शन चुकवू नये असंच आहे.
कलाकाराची वेबसाइट: www.artbyvinita.com
