विरोधकांच्या आंदोलनाला पाठिंबा – शरद पवार

मुंबई – राज्यसभेत कृषी विधेयके मंजूर करताना झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी कृषीविधेयकावर सदस्यांना बाजू मांडू दिली नाही, असा संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर राज्यसभेच्या उपाध्यक्षांचे वर्तन सदनाचे अवमूल्यन करणारे असून निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी अन्नत्याग केला आहे, मीदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कृषीविधेयकावरून राज्यसभेत झालेल्या गोंधळावर आपली भूमिका मांडली.

शशरद पवार म्हणाले, ‘राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी उपोषण सुरु केले असून आपल्या मनातील भावना सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरेच झाले’, असे पवारांनी सांगितले. तसेच ‘सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा असते पण ही विधेयके तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असे दिसत आहे.’ त्याचबरोबर विरोधकांना काही आक्षेप होते, मात्र सदनाचे काम रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न असावा असे दिसत होते, अशी टीका त्यांनी केली.

तसेच ‘हे नियमाविरोधात असल्याचे काहीजण सभापतींना सांगत होते. सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली, नियमाचे पुस्तक वारंवार दाखवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने ते फाडण्याचा प्रकार घडला. नियमाचा आधार सदस्य घेत असतील तर किमान ते ऐकून घेण्याची अपेक्षा उपसभापतींकडून होती. परंतु त्याकडे लक्ष न देता मतदान घेण्यात आले. तेदेखील आवाजी मतदान. साहजिक सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. या सगळ्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे, सदस्यांकडे लक्ष देणे अशी माझी अपेक्षा होती’, असे पवारांनी सांगितले. त्याचबरोबर आदर्श विचारांना तिलांजली देण्याचे काम उपसभापतींनी केले, अशा कठोर शब्दांत त्यांनी जोरदार टीका केली. उपसभापतींचे वर्तन सदनाच्या प्रतिष्ठा आणि पदाचे अवमूल्यन करणारी होती असेही पवार आहेत.

तसेच ‘एकीकडे बाजारपेठ खुली केली, मग कांद्यावर निर्यातबंदी का?’, असा सवाल शरद पवारांनी यावेळी केंद्र सरकारला केला. इतक्या घाईत दोन्ही विधेयके एकत्र संमत करण्याची गरज नव्हती असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर ‘राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी कृषीविधेयकावर सदस्यांना बाजू मांडू दिली नाही. उलट सदस्यांचा विरोध डावलून तात्काळ आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर केले आणि भावना व्यक्त करणाऱ्या सदस्यांना निलंबितही केले. मी गेली ५० वर्षे संसदीय राजकारण करत असून गेल्या ५० वर्षांत मी राज्यसभेच्या उपाध्यक्षांचे असे वर्तन पाहिले नाही’, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर टीका केली.

दरम्यान, यावेळी पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील करायचे होते. त्यामुळे मी दिल्लीला गेलो नाही. मराठा आरक्षणप्रश्नी तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकले पाहिजे. मराठा आरक्षणावरील स्थिगिती उठवली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका असून सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असे पवारांनी म्हटले.

Leave a Reply

%d bloggers like this: