Sunday, June 21, 2026
MAHARASHTRATOP NEWS

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

नागपूर – आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे (78) यांचे आज पहाटे पाच वाजता निधन झाले.

डॉ. भाऊ लोखंडे यांचा जन्म 15 जून 1942 रोजी झाला होता. ते मराठी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले होते. ते विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव या विषयावर पीएचडीसाठीचा शोध प्रबंध लिहिला आहे. तसेच रशियातील बौद्धधर्म हे पुस्तक लिहिले आहे. गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचच्या वतीने 13 फेब्रुवारी 2015 रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भाऊ लोखंडे होते.

भाऊ लोखंडे यांनी अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?, डॉ. आंबेडकरी हितशत्रूंच्या जाणीवा, महाकवी अश्वघोषरचित बुद्धचरित, सौंदरनंद महाकाव्य, डॉ. आंबेडकरी बावीस प्रतिज्ञा, बौद्धांचे सण उत्सव आणि मानसिकता ही पुस्तके लिहिली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading