महिला अभियंत्यांचा वाढता सहभाग उत्साहवर्धक – डॉ. वर्षा भोसेकर

पुणे : “अभियांत्रिकीतील करिअर महिलांसाठी आव्हानात्मक आहे. पण तुमच्यातील उत्साह आणि कामाप्रती निष्ठा तुम्हाला सर्वोच्च स्थानावर घेऊन जाते. संशोधन आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी सर्व पायाभूत सुविधा सरकारी संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढला असून, हे उत्साहवर्धक आहे,” असे मत केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या (सीडब्ल्यूपीआरएस) निवृत्त संचालक डॉ. वर्षा भोसेकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय अभियंता दिवसानिमित्त आयोजित ‘अभियांत्रिकीत महिला अभियंत्यांचे योगदान’वर परिसंवादात डॉ. भोसेकर बोलत होत्या. मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिसंवादात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ, डॉ. नीलिमा राजूरकर, शशी भाटे, संजय मालती कमलाकर, ‘रोटरी’च्या नीता राजपूत, ज्योत्स्ना सराफ, अर्चना माणकेश्वर, उदय कुलकर्णी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे नंदकुमार कासार, सुनील पोटे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. भोसेकर व आवटे यांना ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवार्ड’ प्रदान करण्यात आला. भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीदिनी हा अभियंता दिवस साजरा केला जातो.
डॉ. वर्षा भोसेकर म्हणाल्या, “माझ्या कारकिर्दीत अनेक गोष्टी करता आल्या. तांत्रिक प्रकल्प मार्गी लावता आले. ‘सीडब्ल्यूपीआरएस’ची संचालिका असताना आयएसओ मानांकन मिळाले. जागतिक स्तरावरील या संस्थेत काम केल्याचे समाधान आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. अनेक धरण प्रकल्पांचे नियोजन आणि समन्वयन केले. सौरऊर्जा प्रकल्प राबवले. त्यामुळे ऊर्जेची मोठी बचत झाली. आपल्या सहकाऱ्यांची आणि कुटुंबीयांची साथ मिळाली, तर महिला अभियंता म्हणून उत्तम कारकीर्द तुम्हाला घडविता येऊ शकते.”
वैशाली आवटे म्हणाल्या, “अभियंता म्हणून काम करताना जल नियोजनात भरीव योगदान देता आले. पुण्यासह सातारा आणि इतर ठिकाणी पाण्याचे नियोजन केले. ‘जल है तो कल है’ ही योजना सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपले काम चांगले आणि उद्देश प्रामाणिक असेल, तर महिला किंवा पुरुष असे काही राहत नाही. ज्या ज्या ठिकाणी काम केले, तेथील सर्वच सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले. महिला अभियंत्यांचे योगदान अभिमानास्पद असून, या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. नव्या पिढीतील मुलींनी या क्षेत्रात यावे.” 
प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी प्रास्ताविकात म्हणाले, “महिला अभियंत्यांनी या क्षेत्रात यायला हवे. अनेक महिला अभियंता आज कार्यरत आहेत. मात्र, त्यातील बऱ्याचजणी कार्यालयीन कामकाजात आहे. फिल्डवरील महिला अभियंता वाढाव्यात. त्यासाठी विज्ञान परिषदेतर्फे प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.” इच्छा सूर्यवंशी, गायत्री शिंदे या विद्यार्थिनीनी सूत्रसंचालन केले. सुनील पोटे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: