नाचता येईना अंगण वाकडं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या ‘घराच्या बाहेर पडा’ टीकेला उत्तर दिलं होतं. आपण राज्यातील सर्व स्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या याच विधानावरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या भाषणावर भाजपाने कडाडून विरोध केला आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज म्हणाले की,’जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे मी पोहोचलो. दुर्गम भागात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो. मुळात हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे किती रुग्णालये आणि कोविड सेंटरचं तुम्ही निरीक्षण केलं? राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते आपली जबाबदारी समजून राज्यभरातील रुग्णालयांमध्ये प्रवास करत आहेत. रुग्णांचे हाल जाणून घेत आहेत. प्रशासनाच्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनी विश्वास निर्माण करत आहेत. मग तुम्ही मातोश्रीमध्ये बसल्या बसल्या किती कोविड सेंटरची परिस्थिती जाणून घेतली यांचे उत्तर राज्याच्या जनतेला द्यावं. तुमची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं अशी झाली आहे,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
