Thursday, June 18, 2026
PUNE

नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे,दि.10: तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय समन्वय समिती सभा आज जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा सल्लागार डॉ. राहूल मणियार तसेच समिती सदस्य व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेवून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी तसेच कायद्याबाबत नियमित प्रशिक्षणावर भर द्यावा. नागरिकांनीही अशा पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचे आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून ही कारवाई पोलीस व संबंधित विभागांनी कटाक्षाने राबवावी, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी दिले.

डॉ.देशमुख म्हणाले, सर्व शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन आदी कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी संबंधित विभागांनी व कार्यालय प्रमुखांनी प्रयत्न करावा. शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर आदर्शस्थानी असल्यामुळे शिक्षकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता कामा नये. ‘तंबाखू मुक्त शाळा अभियान’ यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेने नियोजन करावे, असेही डॉ.देशमुख यांनी सांगितले.

डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी सादरीकरणाद्वारे या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading