Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सर्व अटी पाळू पण आंदोलन बेमुदत करू; जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया

 

मुंबई: प्रतिनिधी

आपल्या आंदोलनासाठी घालण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्तींचे आपण काटेकोरपणे पालन करू. मी किंवा माझा समाज हटवादी नाही. इतर सगळ्या अटी आम्ही मान्य करू. मात्र, आंदोलन बेमुदत करू. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आंदोलनाला एक दिवसाचीच परवानगी असेल तर सरकारने एका दिवसात आरक्षण द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

आंदोलनासाठी आंदोलकांना आझाद मैदानाच्या केवळ सात हजार चौरस मीटर जागेवर आंदोलन करण्यास परवानगी मिळणार आहे. या आंदोलनात केवळ 5 हजार आंदोलकांना सहभागी होता येणार आहे. आंदोलनाच्या ठिकाणी ठराविक संख्येने वाहने नेता येणार आहेत. वाहनतळा संबंधी वाहतूक पोलिसांची चर्चा करून निर्णय घेण्याची अट घालण्यात आली आहे. शनिवार, रविवार अथवा कोणत्याही शासकीय आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलन करता येणार नाही, अशा अटी परवानगी देताना घालण्यात आल्या आहेत.

न्यायालयाने आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांच्या मुंबईतील शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून त्यांच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याची हमी देत परवानगीसाठी नव्याने अर्ज सादर केला. त्यानंतर आंदोलनाला अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading