मतचोरीच्या आरोपाला राज ठाकरे यांचा दुजोरा
मतदारयाद्या बारकाईने तपासण्याचे कार्यकर्त्यांना आदेश
पुणे: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांची चोरी करून सत्ता प्राप्त केल्याच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दुजोरा दिला. मतांचे घोटाळे टाळण्यासाठी मतदारयादी बारकाईने तपासण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांच्या आरोपाला पुष्टी दिली. गांधी यांच्या आरोपांबाबत कसून चौकशी करण्यात आली तर सत्ताधाऱ्यांच्या मागील बारा, चौदा वर्षांच्या भानगडी उघडकीला येतील, असे ठाकरे म्हणाले.
मी पूर्वीपासून मतदारयादी आणि मतदान प्रक्रियेत घोळ असल्याचे सांगत होतो. त्यासाठी शरद पवार, ममता बॅनर्जी अशा नेत्यांच्या भेटीही घेतल्या. त्या संदर्भात आमची संयुक्त पत्रकार परिषदही झाली. मात्र, ऐन वेळी त्या नेत्यांनी माघार घेतली, असे ठाकरे यांनी नमूद केले.
आपल्याला मतेच मिळत नाहीत असे तुम्ही समजू नका. मात्र, मतांमध्ये गडबड आहे. आपली मते चोरली जातात. त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागते. मतांची चोरी करून हे सत्तेवर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 132, शिवसेना शिंदे गटाला 56 तर अजित पवार यांच्या पक्षाला 42 जागांवर विजय मिळाला. एवढा मोठा विजय मिळवून सुद्धा विजयाचा जल्लोष कुठेही नव्हता. उलट सन्नाटा पसरला होता. कारण निवडून येणाऱ्यांना देखील या निकालावर विश्वास बसत नव्हता, असे ठाकरे म्हणाले.
