‘… यावर प्रतिक्रिया मी नाही, वारकरी देतील’
सुप्रिया सुळे यांच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
‘मी मटण खाल्ले तर माझ्या विठ्ठलाला चालते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वादग्रस्त विधान वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. वारकरी त्यावर बोलतील, असे फडणवीस म्हणाले.
काही वर्षांपूर्वी मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी सुळे यांच्या मटण खाण्यावरून मोठा वाद उद्भवला होता. नाशिक जिल्ह्यात महात्मा फुले यांच्या पुतळा अनावरणानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तिखट शब्दात भाष्य केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सुळे यांच्या विधानाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुम्हाला वारकरी परंपरेचा सन्मान करता येत नसेल तर किमान अपमान तरी करू नका, असे ते म्हणाले. शरद पवार यांच्या मुलीकडून दुसरी कोणती अपेक्षा ठेवणार, असेही ते म्हणाले.
