आजच्या युवा पिढीला आदर्श वाटतील अशी व्यक्तिमत्वे आज समाजात नाहीत – अभिनेते सुबोध भावे यांचे मत
पुणे : प्रत्येक काळ हा त्याची – त्याची गणितं घेऊन येत असतो. अगदी शंभर, दीडशे वर्षांपूर्वी महात्मा गांधी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यविर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही काही लोक हे भूछत्रा सारखे विचार न करणारे,गोंधळलेले असतील की, परंतु अशा लोकांना कुठेतरी या महापुरुषांनी दिशा दिली हे निश्चित. भूछत्र हा काळा – काळाचा परिणाम असतो मला असे वाटते की, समाजात आजच्या युवा पिढीने कुणाला आदर्श मानावे, कुणाच्या विचारांचे अनुकरण करावे अशी आदर्श व्यक्तिमत्वे दिसत नाहीत हे प्रकर्षाने जाणवते, मात्र भूछत्र आनंदाने उगवत असतील त्यात वावगे काही नाही असे मत अभिनेते – दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केली.
एम.ई.एस. भावे प्राथमिक शाळा सभागृह येथे मिहाना पब्लिकेशन्स प्रकाशित अभय अरुण इनामदार लिखित भूछत्र या कादंबरीचे प्रकाशन भावे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बळता होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वंदना बोकील कुलकर्णी होतया. यावेळी लेखक अभय अरुण इनामदार, प्रकाशिका अमृता कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भावे म्हणाले, आपल्या भोवती असे अनेक कॉल असतात ज्यांचेकडे आमाप पैसा असतो मात्र ते आनंदी नसतात. टू हे करू नको – ते करू नको असे सांगत समाज कुठेतरी आपल्यातला आनंद हिरावून घेतोय असे दिसते, तुमच्या आयुष्यात आनंद कोणत्या गोष्टीने येतो यांचा विचार समाज करत नाही म्हणून आंनाड शोधणारी, विचार करणारी लोक कदाचित समाजाला भुछत्र वाटतात मात्र माणसाच्या जगण्यात, यशात आनंद महत्वाचा असतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
हाती घ्याल ते तडीस न्या हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य आहे, आमच्या शाळेतून बाहेर पडलेले कुणीही बेरोजगार नाही हे अभिमानाने आम्हाला सांगता येते. आज एका वर्गमित्रांची कादंबरी येतेय यांचा आनंद आहे. भूछत्र ही वाचकाला आपली कथा वाटणार आहे, ही रडकथा एका ध्यासाचा, शोधाचा प्रवास आहे. माणसाचा प्रवास निरंतर सुरू असतो काही लोक त्याचा बाऊ करतात तर काही लोक त्याचा तटस्थपणे विचार करतात, असेही भावे यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. वंदना बोकील कुलकर्णी म्हणाल्या, कथा, कादंबरी सारख्या ठेहराव असलेल्या साहित्य प्रकाराला मधल्या काळात फार लोक हात लावताना दिसत नव्हते, परंतु अलीकडे या साहित्य प्रकारातील लेखक वाढत आहेत ही चांगली बाब आहे. भूछत्र कादंबरीतील एक २२ वर्षांचा तरुण त्याच्या नजरेतून समाजाकडे बघतो, त्यात काही सकारात्मक बदल घडवू इच्छितो, बदलांची नोंद त्याच्या कुवती प्रमाणे घेतो आणि कुठेही निराश होत नाही हे बाब अत्यंत महत्वाची आहे. अभय इनामदार यांनी त्यांच्या विज्ञान, तंत्रज्ञान लेखन शैलीतून वेगळी वाट चोखाळत ही कादंबरी लिहिली आहे, यातील नायकाची भाषा ही बदलत्या काळाची आहे, कथेतील नायक हा प्रत्येकाच्या मनाला भिडणार, आपला वाटणार आहे. या कादंबरीवर कुठेतरी कोसला चा प्रभाव जाणवतो मात्र त्यांचे अनुकरण यात नाही असेही त्यांनी नमूद केले.
लेखक अभय इनामदार म्हणाले, कादंबरी लेखनासाठी मनाची तयारी करायला वेळ लागतो. जगण्याच्या पहाण्यातून आपल्याला काय दिसते हे सतत नोंदवावे लागते, त्याची जाणीव ठेवावी लागते मग कुठे तरी हे सर्व शब्दांत उतरवल्या शिवाय गत्यंतर नाही असे वाटते.
प्रकाशिका अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविकामधून या कादंबरीच्या प्रकाशनामागील भूमिका विषद केली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी केला, कादंबरीतील निवडक उताऱ्यांचे वाचन ऋग्वेद इनामदार यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार महाजन यांनी केले.
