असंहिष्णु प्रवृत्ती आपल्या देशाच्या लोकशाहीला घातक – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
पुणे : भारत देश म्हणजे त्यातील आध्यात्मिक लोकशाही आहे. मात्र काही लोकांमध्ये असलेली असंहिष्णु प्रवृत्ती आपल्या देशाच्या लोकशाहीला घातक आहे. तसेच उद्देशहीनता, अस्सलपणाचा अभाव, स्वामित्व भावाचा अभाव आणि आंतर संबंधातील तुष्टीकरण हे आपल्या सांस्कृतिक संचितासमोरील आव्हाने आहेत असे मत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
बीएमसीसी महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य अनिरुद्ध देशपाडे यांच्या पंचाहत्तरी निमित आयोजित कार्यक्रमात ‘आपल्या सांस्कृतिक संचितासमोरील आव्हाने’ या विषयावर डॉ. सहस्त्रबुद्धे बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचे अरुण करमरकर यांनी संपादन केलेल्या ‘आवर्तन -समाजचिंतनाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक, डेक्कन विद्यापीठाचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य देशपांडे यांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा सदस्य डॉ. मेधा कुलकर्णी यांनी विशेष सन्मान केला. तसेच देशपांडे कुटुंबीय आणि परममित्र प्रकाशनाच्या वतीने यानिमित्ताने ‘कौशिक भवन’ च्या उभारणीसाठी मंगल निधी प्रदान केला.
पुढे बोलताना डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, देशपांडे सरांनी अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेला वैचारिक बैठक देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. सामाजिक समरसतेचा विषय सर्वसमान्य माणसात रुजविण्यात त्यांचा वाटा महत्वपूर्ण आहे. त्यांच्या ओजस्वी व्यक्तिमत्वात समाजसाठी कळकळ आहे, त्यांनी दिलेली व्याख्याने ही वक्तृत्व स्पर्धेसारखी नटलेली नव्हती तर सामाजिक मूल्ये शिकवणारी, जोपासणारी होती. त्यांनी अध्यापना बरोबरच संस्था उभारणीत मोठे योगदान दिले आहे यामुळे त्यांनी म्हाळगी प्रबोधिनी मध्ये येऊन ‘संस्था उभारणी’ यावर लिखाण करावे अशी माझी त्यांना विनंती आहे.
डॉ. देगलूरकर म्हणाले, नुसत्या जीवनाला अर्थ नसतो तर जीवन ही संधि असते त्याला अर्थ प्राप्त करून देण्याची. देशपांडे सरांनी अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे. त्यांच्या वयाच्या पेक्षा २५ वर्षे त्यांचे कार्य अधिक मोठे आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही,
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य देशपांडे म्हणाले, आवर्तनात समाज महत्वाचा असतो, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मी काम करत आलो. आपल्या देशाची प्रगती अधिक चांगली होण्यासाठी आपल्याकडे असलेल्या सामाजिक भिंती तोडण्याची गरज आहे. याशिवाय सर्वाना अधिक चांगले शिक्षण देण्याचेही आपल्यापुढे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशपांडे यांचे सहकारी आणि संघाचे कार्यकर्ते सुहास हिरेमठ यांनी आपल्या भाषणातून अनिरुद्ध देशपांडे यांचा जीवनपट उलगाडला.
परममित्र प्रकाशनाच्या स्वाती देशपांडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री देशपांडे यांनी केले तर आभार उपेंद्र देशपांडे यांनी मानले.
