मुंडे यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम, चौकशी झाली पाहिजे : उद्धव ठाकरे
मुंबई : भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेले गूढ अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत उपस्थित झालेल्या संशयांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. आपण कोणावरही आरोप करत नसून केवळ अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून पत्रकार परिषदेत त्यांनी मुंडे यांच्या राजकीय योगदानाचीही आठवण काढली. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दोन्ही नेत्यांचे अकाली निधन दुर्दैवी असल्याचे सांगत, महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक पाळेमुळे रुजविण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचे ठाकरे म्हणाले.
“त्यावेळी आपला माणूस गेला कसा, असा संशय व्यक्त झाला होता. सुरुवातीला याबाबत चर्चा झाली; मात्र नंतर हा विषय शांत झाला. मला वाटते, त्यांच्या मृत्यूचे कारण आणि त्यामागचे गूढ अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही. मी कोणावरही आरोप करत नाही,” असे ठाकरे यांनी सांगितले.
मुंडे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांना संसदेत एकही दिवस उपस्थित राहता आले नाही, याची खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्याची क्षमता असलेला मराठवाड्याचा एक महत्त्वाचा नेता देशाच्या मंत्रिमंडळात पोहोचला होता; मात्र त्यांना सभागृहात काम करण्याची संधीच मिळाली नाही, असे ते म्हणाले.
“माझा संशय चुकीचा असू शकतो. मी कोणावर संशय घेत आहे असे म्हणत नाही. मात्र या घटनेचे रहस्य उलगडलेले नाही आणि त्याचे उत्तर मिळालेले नाही. जसे अजित पवार यांच्या अपघाताबाबतही काही संशय व्यक्त केले जात आहेत, तसे संशय असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे,” असे ठाकरे यांनी नमूद केले.
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना आणि भाजपमधील संबंध दृढ होण्यास हातभार लावल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजपची सुरुवात आणि विस्ताराच्या काळात या दोन्ही नेत्यांची भूमिका महत्त्वाची होती. प्रमोद महाजन रथयात्रेत अग्रभागी होते, तर मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला व्यापक जनाधार मिळवून देण्यासाठी काम केले, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवरून ठाकरे यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. राज्यातील परिस्थितीची पूर्वकल्पना सरकारला नव्हती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कर्नाटक सरकारने संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन ज्या पद्धतीने तयारी केली, तशी तयारी महाराष्ट्र सरकारने का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.
मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांना दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असताना सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
