भारताच्या स्वदेशी HALE UAV कार्यक्रमासाठी टर्बोप्रॉप इंजिन्सच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी भारत फोर्ज आणि आरटीएक्सची प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा एकत्र येणार
नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेल्या हाय-अल्टिट्यूड, लाँग-एंड्युरन्स (HALE) मानवरहित हवाई वाहनामध्ये (UAV) प्रगत टर्बोप्रॉप इंजिन्सच्या एकत्रीकरणाचे मूल्यांकन करण्यासाठी एकत्रितपणे काम करतील, असे भारत फोर्ज लिमिटेड आणि प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा यांनी आज जाहीर केले. प्रॅट अँड व्हिटनी हा RTX चा एक व्यवसाय विभाग आहे.
सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारताच्या स्वदेशी मानवरहित हवाई प्रणालींच्या प्रयत्नांना बळ देणारे हे सहकार्य आहे. प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा इंजिनची सुसंगतता, कार्यक्षमता आणि इंस्टॉलेशन संबंधीच्या आवश्यकतांचे मूल्यांकन करेल. आपल्या प्रगत अभियांत्रिकी, उत्पादन आणि एरोस्पेस प्रणालींमधील क्षमतांचा वापर करून भारत फोर्ज इन्स्टॉलेशन डिझाइन आणि सिस्टीम इंटरफेसेससह इंजिन आणि एअरफ्रेम यांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेचे नेतृत्व करेल.
“भारताच्या स्वदेशी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षमतांना चालना देण्यासाठी भारत फोर्ज एरोस्पेस व्यवसायाला प्रॅट अँड व्हिटनी कॅनडासोबत सहयोग करताना अभिमान वाटतो,” असे भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले. “प्रॅट अँड व्हिटनीच्या जागतिक स्तरावर सिद्ध झालेल्या प्रॉपल्शन तंत्रज्ञानाला भारत फोर्जच्या अभियांत्रिकी आणि प्रणाली एकीकरण कौशल्यासोबत जोडून,भारताचे सामरिक आत्मनिर्भरता आणि संरक्षण सज्जता मजबूत करणाऱ्या जागतिक दर्जाच्या HALE प्लॅटफॉर्मच्या विकासाला पाठिंबा देण्याचे आमचे ध्येय आहे.”
“भारत फोर्जसोबतचे हे सहकार्य एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील भारताच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्याच्या आमच्या निरंतर वचनबद्धतेचे निदर्शक आहे,” असे प्रॅट अँड व्हिटनीचे उपाध्यक्ष आणि कंट्री हेड आशिष सराफ म्हणाले. “प्रॅट अँड व्हिटनी कॅनडाच्या टर्बोप्रॉप इंजिन्सकडे आव्हानात्मक कार्यपरिस्थितींमध्येही विश्वासार्हतेचा सिद्ध झालेला वारसा आहे आणि भारताच्या हेल (HALE) कार्यक्रमाची नेमकी हीच गरज आहे.”
जमीन आणि सागरी क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या देखरेखीची, तसेच गुप्तचर आणि टेहळणीची सुविधा HALE UAVs पुरवतात.
