Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

साथसंगतीसोबतच हार्मोनिअमचे एकल वादन प्रचलित व्हावे

सुप्रसिद्ध हार्मोनियमवादक तन्मय देवचके यांची अपेक्षा

पुणे : “हार्मोनिअम या वाद्याकडे आपण केवळ साथसंगत करणारे वाद्य म्हणून पाहतो. मात्र गेल्या काही वर्षांत तबला, सतार अशा वाद्यांच्या एकलवादनाला चांगला प्रतिसाद मिळत असताना साथसंगतीसोबतच हार्मोनिअमचे एकल वादन प्रचलित व्हावे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक तन्मय देवचके यांनी व्यक्त केली. तन्मय यांच्या स्वरानुजा या म्युझिक अकादमीच्या वतीने आज ‘उगम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. उगम या कार्यक्रमाचे हे सलग चौथे वर्ष होते, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. रसिक पुणेकरांनी पावसाच्या वातावरणातही याला विशेष हजेरी लावली.

कार्यक्रमादरम्यान तन्मय यांचे आजोबा गोपाळ देवचके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावनी राहुल जोशी या आश्वासक हार्मोनियम वादक विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. आशुतोष कुलकर्णी, अभय देवचके आणि एन. डी. जोशी यांच्या हस्ते या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

तन्मय यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या ‘सुंदर ते ध्यान…’ या अभंगाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी राग भूप, राग बागेश्री, राग मियां की तोडी, ‘जा जा रे बदरा तू…’ ही राग शुद्ध सारंग मधील बंदिश सादर केली. यानंतर तन्मय यांचे ज्येष्ठ शिष्य निलय सालवी व अथर्व कुलकर्णी यांनी एकल  हार्मोनियमवादन सादर केले. यावेळी त्यांनी राग सहस्त्र दीप आणि राग नटभैरव यांचे सादरीकरण केले. यावेळी अनिश थत्ते यांनी तबलासाथ केली.

स्वत: तन्मय देवचके यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी त्यांनी राग चारुकेशी मधील तीनतालातील बंदिश सादर केली. याशिवाय यांनी ताल मिश्र चापू आणि राग केदार यांचेही बहारदार सादरीकरण केले. स्वरचित अनुभूती ही रचना पेश करीत त्यांनी समारोप केला. सोहन गोराने आणि अनिश थत्ते यांनी तबला, रोहित खवळे (पखवाज) आणि अनय लवाटे (किबोर्ड) यांनी साथसांगत केली. सृजन देवचके आणि अन्वी पाटणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading