Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहराला मिळाला पथारी व्यावसायिकांसाठीचा पहिला सुनियोजित हॉकर्स पार्क

पुणे :  एक आदर्श ठरू शकेल असा पथारी व्यावसायिकांसाठी असलेला पहिला सुनियोजित असा हॉकर्स पार्क ‘नुक्कड’ आता पुणे शहराला मिळाला आहे. पुण्यातील पंचशील फाउंडेशनच्या संकल्पनेतून याची निर्मिती करण्यात आली असून खराडी येथील सर्व्हे क्रमांक १, फाऊंटन रस्ता, वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ सदर प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी आज झालेल्या एका विशेष कार्यक्रमात पंचशीलचे अतुल चोरडिया यांनी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना सदर प्रकल्प हस्तांतरित केला. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील आज या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते. 
नुक्कड हॉकर्स पार्क हे तब्बल ८६ हजार चौरस फूट जागेत पसरलेले असून विक्रेत्यांसाठी ते एक समर्पित विक्री क्षेत्र आहे असे म्हणता येईल. या प्रकल्पामध्ये १२० युनिट्स आहेत ज्यात फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांसाठी ५० ओटे, इतर आवश्यक सामानांच्या खरेदीसाठी ५० युनिट्स आणि बेकरी, सलून, कार- सायकल दुरुस्ती, कुलूप दुरुस्ती, कार वॉश यांसारख्या आवश्यक सेवा यांसोबतच भाज्यांसाठी पोटॅशियम धुण्याचे वेगेळी जागा अशा सेवांसाठी २० युनिट्स यांचा समावेश आहेत. या जागेत फुलविक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते आणि फूड ट्रकसाठी कंटेनर देखील आहेत. नुक्कडमध्ये प्रसाधन गृह, ५० चार चाकी व १५० दुचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील विक्री युनिट्स टाकून दिलेल्या शिपिंग कंटेनरचा पुनर्वापर करीत बनवले गेले असून पर्यावरण-जागरूक डिझाइनचा वापर यामध्ये करण्यात आला आहे हे विशेष.
याप्रसंगी बोलताना पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, “पुण्यात सुमारे १२ हजार परवानाधारक पथारी व्यावसायिक आहेत. पथारी व्यावसायिक हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग असतात. परंतु आजवर म्हणावे तसे लक्ष त्यांच्याकडे दिले गेलेले नाही. अशा प्रकारच्या पथारी व्यावसायिकांसाठी त्यांना आवश्यक सुविधा व सुयोग्य वातावरण मिळण्यासाठी त्यांचे प्रमाणीकरण गरजेचे आहे. ‘नुक्कड’ सारखे प्रकल्प यादृष्टीने नक्कीच महत्वाचे ठरतील. अशा प्रकल्पांमध्ये दिव्यांग व ट्रान्सजेन्डर व्यक्तींना कसे सामावून घेता येईल याकडे आपण लक्ष द्यायला हवे. नजीकच्या भविष्यात नुक्कड सारखे आणखी प्रकल्प शहरात उभे करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

वडगाव शेरी भागाचे आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, “गेल्या काही वर्षांत खराडीचा विकास वेगाने होत आहे आणि अशा प्रकल्पामुळे या भागातील पायाभूत सुविधांमध्ये मोलाची भर पडेल. सर्वसमावेशक प्रयत्नांच्या माध्यमातून खराडीला एक आदर्श उपनगर म्हणून विकसित करण्यावर आमचा भर असून यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व प्रयत्न करू. सीएसआरद्वारे खराडीमध्ये राखीव जमिनीच्या विकासासाठी आम्ही नक्कीच पाठपुरावा करू.”

पंचशीलचे अतुल चोरडिया म्हणाले, “सीएसआर उपक्रमांमधून नुक्कड हा प्रकल्प विकसित करून आम्ही सर्वांसमोर एक यशस्वी उदाहरण ठेवत आहोत. पुणे शहरातील विविध ठिकाणी महानगरपालिका या प्रकल्पाचे अनुकरण करू शकते. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आज सुमारे २२०० भूखंड विकासाच्या प्रतीक्षेत असून अशा काही भूखंडांचा वापर नुक्कड सारख्या संकल्पनांसाठी नक्कीच करता येईल.”

शहरातील एक महत्वाचे आयटी हब म्हणून उदयास येत असलेल्या खराडीमुळे तब्बल ३ लाख नागरिकांना थेट नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेतयाशिवाय अप्रत्यक्षपणे तब्बल तीन पट नागरिकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या भागाच्या सध्याच्या आणि नजीकच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मेट्रो कनेक्टिव्हिटीची निश्चितच आवश्यकता आहे. जर महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला जमीन देण्यात आली तर आम्ही आमच्या सीएसआरद्वारे खराडीमध्ये खेळाचे मैदान आणि सार्वजनिक उद्यान विकसित करू. पुढील ३ वर्षे पंचशील फाउंडेशनच्या वतीने नुक्कडची देखभाल करण्यात येईल, अशी माहितीही चोरडिया यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading