Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

आषाढी एकादशीचे औचित्य साधत रंगली संतवाणी…

पुणे  : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या ‘संतवाणी’ची अनुभूती पुणेकरांनी घेतली. निमित्त होते आषाढी एकादशीचे औचित्य साधत पुण्यातील आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संतवाणी’ या विशेष कार्यक्रमाचे. किराणा घराण्याच्या गायकांच्या अभंग सादरीकरणाने ‘संतवाणी’ हा कार्यक्रम रसिकांना आत्मानंदाची अनुभूती देणारा ठरला.

भरतनाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं उपेंद्र भट, भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी, नातू विराज जोशी आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य व गायक आनंद भाटे यांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कलाकारांनी ‘संतवाणी’च्या माध्यमातून भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना जणू स्वरांजली अर्पण केली.

या चारही कलाकारांनी एकत्रितपणे ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या जयघोषात कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर श्रीनिवास जोशी यांनी ‘सुख अनुपम संतांचे’ आणि ‘आता कोठे धावे मन…’ हा संत चोखोबांचा अभंग गायला. आनंद भाटे यांनी ‘इंद्रायणी काठी…’ आणि ‘जनी धाव आता कंठ माझा सुकला…’ हा सवाई गंधर्व यांनी गायलेला अभंग प्रस्तुत केला.

‘नामाचा गजर…’ आणि ‘पंढरी निवासा सख्या पांडूरंगा…’ हा संत नामदेव यांचा अभंग गात विराज जोशी यांनी उपस्थितांची दाद मिळविली. श्रीनिवास व विराज जोशी यांनी एकत्रितपणे ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या अभंगाने भक्तीमय वातावरणाची अनुभूती दिली.

पं. उपेंद्र भट यांनी यानंतर ‘समचरण तुझे देखिले…’ व ‘माझे माहेर पंढरी…’ हे अभंग प्रस्तुत केले. त्यांनी एका कानडी भजनाचे देखील सादरीकरण केले. ‘जो भजे हरी को सदा…’ या भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला.

यावेळी पांडुरंग पवार (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), राहुल गोळे (ऑर्गन), गंभीर महाराज (पखवाज), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली. उल्हास पवार यांनी कार्यक्रमाचे सुंदर निरुपण करीत अभंगांचा भावार्थ उलगडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading