Wednesday, November 11, 2026
Latest NewsPUNE

अपर्णा पणशीकर यांच्या सादरीकरणातून वझेबुवांच्या गायकीची अनुभूती

पुणे : ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचे ख्यातकीर्त गायक, संगीतकार कै. पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्या पठडीतील गायकीची अनुभूती आज रसिकांना आली. निमित्त होते कै. वझेबुवा यांच्या पुण्यतिथीदिनी अल्फा इव्हेटस्‌‍तर्फे आयोजित स्वरांजली या सांगीतिक कार्यक्रमाचे!

वझेबुवा यांचे शिष्य पंडित भास्करबुवा जोशी यांच्याकडून गायनाची तालीम घेतलेल्या प्रसिद्ध गायिका अपर्णा पणशीकर यांचे गायन झाले तर डॉ. चैतन्य कुंटे यांनी वझेबुवांच्या गायन शैलीविषयी विस्तृत विवेचन करीत त्यांचा सांगीतिक प्रवास उलगडला.
ग्वाल्हेर, जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केलेल्या अपर्णा पणशीकर यांनी मैफलीची सुरुवात अल्हैय्या बिलावल रागातल ‌‘दैया कहा‌’ या बड्या ख्यालने केली. त्यालाच पुढे ‌‘आनंदकारी‌’ या छोट्या ख्यालची जोड देत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर खट रागातील ‌‘तू है धर्मराज‌’ हा बडा ख्याल सादर करून ‌‘हर दम मौला तेरे‌’ हा छोटा ख्याल प्रभावीपणे ऐकविला. अपर्णा पणशीकर यांना लीलाधर चक्रदेव (संवादिनी), प्रणव गुरव (तबला), माधवी घुमटकर, शुभांगी दंताळे (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. चैतन्य कुंटे यांनी वझेबुवांच्या गायन शैलीविषयी विवेचन करताना वझेबुवांच्या गायनातील वैशिष्ट्ये, त्यांची कलाकार म्हणून घडलेली कारकीर्द, त्यांच्या गायनातील वेगळेपण, शिष्यांना ज्ञान द्यायची त्यांची तळमळ या विषयी रसिकांना अवगत केले. वझेबुवांकडे राग खोलण्याची तरकीब होती असे सांगून कुंटे म्हणाले, शंभर वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रीय गायनातील खयाल गायकी निबद्ध होती, चौकटीत बांधलेली नव्हती त्यामुळे त्यांच्या शिष्यांमध्ये वझेबुवा ठळकपणे जाणवतात पण ते तुकड्यातुकड्याने. डॉ. कुंटे यांनी वझेबुवांनी गायलेला राग बहार वैभव, गारा बागेश्री आणि ठुमरीची झलक श्राव्य माध्यमातून ऐकवली. वझेबुवा गायनाची मैफल रंगविताना त्यात उत्स्फूर्तपणे विविध रंगछटांचे दर्शन घडवित असत त्यामुळे त्यांची एकाच रागातील दुसरी मैफल कधीच एकसारखी नसे. त्यांच्या गायकीत तीव्रीकरणाचे तत्त्व प्रकर्षाने जाणवत असे. तसेच त्यात नाट्यशास्त्रीय तत्त्वही दिसे ज्यामुळे मैफल अधिकाधीक उत्कंठावर्धक होत असे. ज्या काळात मोठ मोठे गवई आपले गाणे चोरून ठेवत त्या काळात वझेबुवांनी आपली विद्या उदारपणाने वाटली. यामुळेच त्यांचे गाणे त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून प्रवाहित होत राहिले. ते पुढे म्हणाले, बुवांचे मैफलीतील गाणे आणि शिकविण्यातील गाणे वेगवेगळे असे. ‌‘स्व‌’ बाजूला ठेवून गाणे शिकवावे लागते या विचारांमुळेच वझेबुवांनी गायन क्षेत्रात छाप निर्माण केले नाहीत. कार्यक्रमाची सांगता वझेबुवांच्याच आवाजातील राग भैरव भटियार ऐकवून करण्यात आली.
कलाकारांचा सत्कार ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मीरा पणशीकर, अंजली जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन आरती पटवर्धन यांनी केले.

Leave a Reply