Monday, November 9, 2026
Latest NewsPUNE

सूर महती महोत्सवाचे १४ व १५ नोव्हेंबर रोजी आयोजन

पुणे : ख्यातनाम शास्त्रीय गायिका स्व. संगीत महामहोपाध्याय डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सूर महती फाउंडेशनच्या वतीने शनिवार, दि. १४ आणि रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सूर महती महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रस्त्यावरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागील फरशी मैदानावर सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत, सरोद वादन आणि कथक नृत्य अशा विविध कलाप्रकारांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सुरुवातीला सुरश्री जोशी आणि चिन्मयी ओक यांचे सहगायन होईल. त्यानंतर अभिषेक बोरकर यांचे सरोद वादन, अबंती भट्टाचारजी यांचे ठुमरी-दादरा गायन आणि पं. संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय गायनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.

रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या दिवसाची सुरुवात अतुल खांडेकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. त्यानंतर पद्मश्री पं. गोपीकृष्ण यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना पंडिता मनीषा साठे यांचे कथक नृत्य सादर होईल. याच दिवशी मानपत्र प्रदान सोहळा पार पडणार असून, त्यानंतर पं. साजन मिश्रा आणि स्वरांश मिश्रा यांचे सहगायन होईल.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या महोत्सवातही संगीत आणि समाजप्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दोन मान्यवरांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. भारतातील आघाडीचे हार्मोनियम वादक, नामांकित साथसंगतकार आणि एकल वादक डॉ. अरविंद थत्ते तसेच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डॉ. हरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात येईल.

डॉ. अरविंद थत्ते यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात एकल हार्मोनियम वादन आणि साथसंगतीद्वारे मोलाचे योगदान दिले आहे. मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, के. जी. गिंडे, कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, सी. आर. व्यास, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, मालिनी राजूरकर, प्रभा अत्रे, परवीन सुलताना, लक्ष्मी शंकर, विजय सरदेशमुख आणि शोभा गुर्टू यांसारख्या दिग्गज गायक-गायिकांना त्यांनी हार्मोनियमची साथ केली आहे. साथसंगतकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याबरोबरच एकल वादनातही त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

डॉ. जगन्नाथ दीक्षित हे लठ्ठपणा आणि मधुमेह मुक्तीसाठी जीवनशैलीतील बदल आणि योग्य आहाराचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्यासाठी ओळखले जातात. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दीक्षित यांनी आहार आणि जीवनशैलीविषयक शास्त्रशुद्ध माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या लठ्ठपणाविरोधी मोहिमेचे ते ब्रँड अॅम्बेसेडर होते.

सूर महती महोत्सवामध्ये लीलाधर चक्रदेव, प्रणव गुरव, अरविंद भट्टाचारजी , मालू गावकर, केदार टिकेकर, अर्पिता वैशंपायन, वल्लरी आपटे, सुनील अवचट, निखिल फाटक, राजीव तांबे, अजिंक्य जोशी, अभिषेक शिनकर, पांडुरंग पवार आणि सुयोग कुंडलकर हे कलाकार साथसंगत करतील. डॉ. वंदना बोकिल-कुलकर्णी महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील.

महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रवेशासाठी पास आवश्यक आहेत. विनामूल्य प्रवेशिका शनिवार, दि. ७ नोव्हेंबरपासून टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ आणि अजय फूड प्रोसेसर्स येथे उपलब्ध असतील. तसेच दोन्ही दिवशी कार्यक्रमाच्या एक तास आधी कार्यक्रमस्थळीही प्रवेशिका उपलब्ध असतील, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply