Monday, November 9, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कारखाने कसे चालतात हे न कळणाऱ्यांना काय उत्तर देणार?

रोहित पवारांचा राजेंद्र राऊतांना टोला
सोलापूर : बारामती अॅग्रोच्या डिस्टिलरीतून होणाऱ्या मद्यनिर्मितीवरून भाजप आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे. बारामती अॅग्रोने मद्यनिर्मिती बंद करून त्यासाठी वापरले जाणारे पाणी शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी राजेंद्र राऊत यांनी केली होती. तसेच मागणी मान्य न झाल्यास बारामतीत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या या टीकेला रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
कारखाने आणि डिस्टिलरी कशा चालतात, याची ज्यांना माहिती नाही, त्यांना आपण काय उत्तर देणार, असा सवाल करत रोहित पवार यांनी राऊत यांची खिल्ली उडवली. पाचवीत शिकणारा मुलगाही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो, असा टोला त्यांनी लगावला. रोहित पवार सध्या राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत असून, रविवारी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी ग्रामविकासमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरही निशाणा साधला. पालकमंत्री बालाजी सरोवर येथेच दिवसभर बैठका घेत असल्याची टीका त्यांनी केली. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे दिवसभर कष्ट सुरू असल्याचा उपरोधिक उल्लेख करत, कष्ट जास्त झाले की माणूस गोळ्या खातो, असे वक्तव्य त्यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना आपण घरी दिवाळी साजरी करत नाही. कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसोबतच दिवाळी साजरी करत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. सोमवारी गोकुळ दूध संघाच्या संदर्भात होणारे आंदोलन अधिक व्यापक होईल, असा दावाही त्यांनी केला.
राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, सरकार रडीचा डाव खेळत आहे. न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर तो स्वीकारण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. सध्या सुरू असलेले प्रकार संविधानविरोधी आहेत. संबंधित प्रकरणात कोण किती कोटींचा मालक आहे, यापेक्षा वस्तुस्थिती समोर येणे महत्त्वाचे आहे. हजारो लोकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या दादांच्या बाबतीत नेमके काय घडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासातही अपेक्षित प्रगती होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी विचारपूर्वक बोलावे आणि मूळ विषयाला बगल देऊ नये, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. अजितदादांची दोन्ही पवार कुटुंबे एकत्र आली पाहिजेत, अशी इच्छा होती. ते आज असते तर विलीनीकरण झाले असते, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या दहा दिवसांत सुनील तटकरे यांनी राजकारण सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला.
शरद पवार आजारी असल्याने काही नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटींना राजकीय चर्चेचे स्वरूप देण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. अशा चर्चांमधून काहीही साध्य होणार नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
सोलापूरमधील प्रस्तावित प्रकल्पांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. न्यूक्लिअर आणि हायड्रोजन प्रकल्प रद्द झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला. तसेच एआय डेटा सेंटरमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि रोजगारनिर्मितीही मर्यादित राहते, असे ते म्हणाले. दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करूनही केवळ ४०० नोकऱ्या निर्माण होणार असतील, तर अशा प्रकल्पांचा स्थानिकांना किती फायदा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असताना महाराष्ट्रातही रोजगारनिर्मिती करणारे उत्पादन उद्योग आणण्याची गरज आहे. सोलापूरसह राज्यातील विविध भागांत मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारावीत, अशी मागणी त्यांनी केली. अक्कलकोटमधील नागरिकही पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवत असून, पालकमंत्र्यांनी या समस्येवर कोणतेही प्रभावी नियोजन केले नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

Leave a Reply