Monday, November 9, 2026
Latest NewsPUNE

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करा! उपमहापौर परशुराम वाडेकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

– वडगाव शेरी मतदारसंघात १५ शाखांचे उद्घाटन; कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती पत्रांचे वाटप उत्साहात

पुणे  : रिपब्लिकन पक्ष हा खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पक्ष असून, श्रमिक, कष्टकरी आणि समाजासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. बाबासाहेबांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून पक्षाशी एकनिष्ठ राहावे आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), पुणे शहराच्या वतीने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी १५ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वडगाव शेरी परिसरातील ब्रह्मा सनसिटी रोडवरील समर्थ बँक्वेट हॉल येथे कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वाडेकर बोलत होते.

यावेळी शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, वडगाव शेरी मतदारसंघ अध्यक्ष विनोद टोपे,  ख्रिश्चन आघाडीचे शहराध्यक्ष क्रिस्टोपर राजमनी, नगरसेवक निलेश आल्हाट,नगरसेविका हिमाली कांबळे, बाबुराव घाडगे, शहर उपाध्यक्ष सुनील गवळी, अर्जुन आल्हाट, निलेश रोकडे, फिरोज खान, शमशुद्दीन शेख, चांदणी गायकवाड, मीनाज मेमन, हर्षदा गायकवाड, रेणुका चलवादी, भारत पवार, भीमा राठोड, भीमराव वानखेडे, पोपट कांबळे, संग्राम रोहम, अयुब जहागीरदार, संग्राम साळवे, सुधीर जगताप, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, जितेंद्र कांबळे, सुयश वाघमारे, किरण अवसरमल, चंद्रकांत जगधने, फिरोज शेख, आबा गायकवाड, नवनाथ रिठे, शशिकला थोरात, किरण सूर्यवंशी, स्टेनली नाथन, शंकर शेलार, सविता शेलार, मगेंद्र पिल्ले, आश्विन गवळी, ऋषिकेश गवळी, संतोष खरात, कृष्णा खिल्लारे आदि उपस्थित होते.

वाडेकर म्हणाले, मतांची चोरी झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी काँग्रेसमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीत पराभव झाला, त्याला काँग्रेस जबाबदार होती, याचे उत्तर आधी द्यावे. दिवसातून तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांनी जाऊ नये. आजच्या राजकारणात निष्ठा हीच नेत्यांची खरी ओळख आहे. आगामी काळात सर्वसामान्य नागरिक पक्षनिष्ठेला अधिक महत्त्व देतील.

संजय सोनवणे म्हणाले, शाखा निर्मितीच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार होणे अत्यंत गरजेचे आहे. पक्षवाढीच्या दिशेने शाखा निर्मिती हे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे.

बाळासाहेब जानराव म्हणाले, पुणे शहरात रिपब्लिकन पक्षाचे गतवैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. मित्रपक्ष सध्या रिपब्लिकन पक्षाला नगरसेवक निवडणुकीत केवळ पाच ते सहा जागा देतात. मात्र, पक्षाची ताकद एवढी वाढवली पाहिजे की मित्रपक्षांनी स्वतःहून किमान ४० जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात.

श्याम सदाफुले म्हणाले, शाखा सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक आपल्या समस्या घेऊन कार्यकर्त्यांकडे येतील. कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यातूनच पक्ष सर्वसामान्यांच्या घराघरांत पोहोचेल.

महिपाल वाघमारे म्हणाले, श्याम सदाफुले आणि विनोद टोपे यांनी पक्षवाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. अनुभवी आणि नव्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुण्यात पक्षाची ताकद वाढत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी पद मिळाल्यानंतर केवळ घरी न बसता नेतृत्वाप्रती निष्ठा दाखवत सक्रियपणे काम करावे.

नगरसेविका हिमाली कांबळे यांनी एकाच दिवशी १५ शाखांचे उद्घाटन झाल्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाला निश्चितच बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या १५ ठिकाणी शाखांचे उद्घाटन

वडगाव शेरी मतदारसंघातील पांडू लमान वस्ती, येरवडा, केंद्रीय विद्यालय चौक, डेक्कन कॉलेज रोड, प्रतीकनगर, विश्रांतवाडी, भरत ढाबा, धानोरी, कृष्णा हॉटेलसमोर, टिंगरेनगर, बर्माशेल चौक, फाइव्ह नाइन, लुंबिनी उद्यान, नागपूर चाळ, गोल्फ क्लब चौक, एअरपोर्ट रोड, जयप्रकाशनगर, येरवडा, रामवाडी मेट्रो स्टेशन, नगर रोड, आनंद निकेतन शाळेसमोर, विमाननगर, इनॉर्बिट कॉर्नर, सोमनाथनगर, गंगा अर्केडिया, मणिपाल हॉस्पिटलशेजारी, खराडी बायपास आणि ब्रह्मा सनसिटीसमोर अशा विविध ठिकाणी शाखांचे उद्घाटन करण्यात आले.

 

Leave a Reply