Thursday, November 12, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अजितदादांच्या पहिल्या स्मृतिदिनापूर्वी राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे; अमोल मिटकरींची इच्छा


अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणे हीच दिवंगत अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे येत्या २८ जानेवारीला असलेल्या अजितदादांच्या पहिल्या स्मृतिदिनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचे त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार गटातील नेत्यांची सुरू असलेली ये-जा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे या राजकीय घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चेला आमच्याकडून पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अलीकडील राजकीय भेटीगाठींमुळे या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच अजित पवार यांच्या पहिल्या स्मृतिदिनापूर्वी दोन्ही पक्ष एकत्र यावेत, अशी इच्छा मिटकरी यांनी व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना आणखी चालना मिळाली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मिटकरी सातत्याने करत आहेत. या प्रकरणात घातपाताची शक्यताही त्यांनी यापूर्वी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आमदार पक्ष सोडून जाणार असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या विधानावर मिटकरी यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. आमच्या पक्षाची चिंता करण्यापेक्षा संजय राऊत यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी, असा टोला त्यांनी लगावला.
अजित पवार यांच्या स्मृतिदिनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे, या मिटकरींच्या इच्छेमुळे राज्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply