सुटे दूध, तूप आणि खाद्यतेल खरेदी करणे टाळा; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ग्राहकांना सल्ला
मुंबई : बाजारातून सुटे दूध, तूप आणि खाद्यतेल खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घ्यावी. अन्नपदार्थांची गुणवत्ता, साठवणूक आणि भेसळ याबाबत खात्री नसल्याने सुटे पदार्थ खरेदी करणे टाळावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. पाश्चराईज दूध नेहमी सीलबंद पिशवी किंवा पॅकेटमधूनच खरेदी करावे आणि त्यावरील उत्पादन व अंतिम वापराची तारीख तपासावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे यांनी कच्चे दूध आणि दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले सुटे दूध यातील फरक समजावून सांगितला. शेतकऱ्यांकडून थेट कच्चे दूध खरेदी करणे आणि दुकानातून सुटे दूध घेणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे ग्राहकांनी दुकानातील सुटे दूध घेणे टाळावे, असे त्यांनी सांगितले.
दूध ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याची साठवणूक कोणत्या परिस्थितीत केली जाते, याबाबत अनेकदा माहिती नसते. दुकानातील फ्रिजमध्ये योग्य तापमान राखले जाते का, दूध वाहून आणणारे टँकर स्वच्छ असतात का आणि त्यामध्ये आवश्यक तापमानाची व्यवस्था असते का, याची खात्री ग्राहकांना देता येत नाही. दुधाची सुरक्षितता टिकवण्यासाठी ते चार अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवणे आवश्यक असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
गाय किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर ते सामान्य तापमानात दोन तासांपेक्षा अधिक काळ उघड्यावर ठेवल्यास त्यामध्ये दुधाची गुणवत्ता खराब करणारे घटक निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दुधामध्ये आंबटपणा वाढण्याची शक्यता असते. म्हणून दूध हाताळणी आणि साठवणुकीच्या प्रक्रियेत योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तूप, लोणी आणि वनस्पती तेलामध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ करण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही मुंढे यांनी विक्रेत्यांना दिला. शुद्ध देसी तूप, शुद्ध दूध किंवा १०० टक्के प्युअर अशा स्वरूपाचे दावे करून ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असे त्यांनी बजावले.
ग्राहकांनीही अशा जाहिराती आणि दाव्यांना बळी पडू नये. एखादा विक्रेता कोणताही ठोस आधार नसताना उत्पादनाच्या शुद्धतेबाबत मोठे दावे करत असल्याचे आढळल्यास त्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला द्यावी. संबंधित विक्रेत्याची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे मुंढे यांनी सांगितले.
दैनंदिन आहारातील दूध, तूप आणि खाद्यतेल यांसारख्या पदार्थांच्या खरेदीबाबत ग्राहकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि गुणवत्ता राखण्यासाठी विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, तसेच ग्राहकांनीही योग्य उत्पादनांची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
